Railway News: कॅन्सल तिकिटांबाबत रेल्वे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
रेल्वेच्या कॅन्सल होणाऱ्या तिकिटांवर लावण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात दीर्घकाळापासून चर्चा होत आहे. कॅन्सल तिकिटांसाठी वेगवेगळ्या श्रेणीप्रमाणे हे शुल्क ३० ते ६० रुपये आहे. आता हे शुल्क न कापण्याबाबत रेल्वेकडून विचार केला जात आहे.

रेल्वे आता कॅन्सल तिकिटांवर प्रवाशांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. रेल्वेच्या सध्याच्या नियमानुसार एखादे तिकीट बुक केले असेल आणि ते वेटींग लिस्टवर दिसत असेल, तर रद्द झाल्यानंतरही पूर्ण परतावा दिला जात नाही. कारण रेल्वेकडून काही शुल्क वजा केले जाते. विविध प्रकारच्या श्रेणीनुसार हे शुल्क ३० ते ६० रुपये असते. त्यामुळे प्रवाशांना दुहेरी फटका बसतो. एकीकडे प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होत नाही, दुसरीकडे त्यांना पूर्ण रिफंडही मिळत नाही. आता रेल्वे हे शुल्क रद्द करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे वेटींग तिकीट कन्फर्म झाले नाही तर प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळणार आहे.
रेल्वेकडून प्रस्तावावर विचार
रेल्वेच्या कॅन्सल होणाऱ्या तिकिटांवर लावण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात दीर्घकाळापासून चर्चा होत आहे. कॅन्सल तिकिटांसाठी वेगवेगळ्या श्रेणीप्रमाणे हे शुल्क ३० ते ६० रुपये आहे. जे तिकीट आम्ही स्वत: रद्द करत नाही आणि ते प्रतिक्षा यादीवर असल्यामुळे रद्द होते, त्यावर रेल्वेकडून शुल्क का आकारले जाते? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावर दीर्घकाळापासून विचारही सुरु होता. आता हे शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव रेल्वेपुढे ठेवण्यात आला आहे. त्यावर रेल्वेकडून विचार केला जात आहे.
किती पैसे कापले जातात
तिकीट बुकींग आयआरसीटीसी पोर्टलवरुन केल्यानंतर ते प्रतिक्षा यादीवर असेल तर ऑटोमेटड रद्द होते. शुल्क कापून उर्वरित रक्कम आपल्या खात्यात येते. त्यानंतर क्लर्क चार्जशिवाय इतर काही शुल्क कापून रक्कम दिली जाते. सध्या 2S श्रेणीतील तिकीट रद्द झाल्यावर ३० रुपये शुल्क लागते. शयनयान श्रेणीत हे शुल्क ६० रुपये आहे. तसेच थर्ड एसीसह इतर क्लासमध्ये हे शुल्क ६० रुपये प्लस जीएसटी आहे.
प्रवाशांची संख्या वाढली
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये रेल्वेला २.७ लाख कोटी रुपयांची कमाई झाली. या उत्पनातील मोठा वाटा मालवाहतुकीचा आहे. रेल्वेला मालवाहतुकीतून १.७५ लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. तसेच रेल्वेच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७३५ कोटी झाली आहे.
