
Rajnath Singh : भारताच्या मेक इन इंडिया या धोरणाचा ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठा फायदा झाला. या धोरणाने ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. तसेच भारताच्या अॅडव्हानस, मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) मॉडेलच्या अंमलबजावणीमुळे आता पहिल्यांदाच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत खासगी क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या संरक्षण क्षेत्रांतील प्रकल्पांत सहभागी होण्याची संधी मिळेल, असंही ते म्हणाले. ते दिल्लीत बोलत होते.
दिल्लीमध्ये 29 मे 2025 रोजी भारतीय उद्योग परिसघांच्या (सीआयआय) वार्षिक शिखर संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. भारताच्या एएमसीए कार्यक्रमाअंतर्गत भारतात पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाची निर्मिती करण्यात येणार आहे. भारताचे हे पाऊल साहसी आणि निर्णायक असल्याचेही यावेळी ते म्हणाले. देशांतर्गत एअरोस्पेस क्षेत्रात मोठी प्रगती होईल. एएमसीए योजनेअंतर्गत अशा पाच प्रोटोटाईप विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर अशा विमानांचे श्रृंखलाबद्ध उत्पादन होईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी मेक ईन इंडिया हे धोरण कसे पुरक ठरले याबाबतही सांगितले. भारत स्वदेशी संरक्षण क्षमतेत मजबूत झाला आहे. असे झाले नसते भारताची सेना पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या दहशतवादी कारवायांना आपल्याला प्रभावीपणे तोंड देता आले नसते, अस मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
तसेच, देशाची सुरक्षा आणि समृद्धीसाठी मेक इन इंडिया ही मोहीम फार महत्त्वाची आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने तयार केलेल्या प्रणालींचा वापर करण्यात आला. याच प्रणालींमुळे भारत शत्रूचे कोणतेही सुरक्षाकवच भेदू शकतो हे सिद्ध झाले आहे. देशाच्या लष्कराने दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानी लष्करी तळांना नष्ट केलं आहे. आपला देश अजून बरंच काही करू शकला असता. मात्र आपल्या देशाने शक्ती आणि संयम दोन्ही दाखवलं, असंही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.