मोठी बातमी: माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरींचे कोरोनामुळे निधन

उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ते सातवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. | Ajit Singh Rashtriya Lok Dal

मोठी बातमी: माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरींचे कोरोनामुळे निधन
अजित सिंह
| Updated on: May 06, 2021 | 9:03 AM

लखनऊ: राष्ट्रीय लोकदलाचे (RLD) अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी (Ajit Singh) यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अजित सिंह यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा प्रचंड संसर्ग झाला होता. परिणामी त्यांची प्रकृती नाजूक होती. (Rashtriya Lok Dal chief and former Union minister Ajit Singh dies of Covid-19)

अजित सिंह चौधरी हे देशाचे माझी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचे पूत्र होते. उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ते सातवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. अजित सिंह चौधरी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनाबद्दल रालोद आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांमध्ये रालोद आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीला लक्षणीय यश मिळाले होते. बागपत, मेरठ, शामली, अलीगढ आणि मथुरेत रालोद पक्षानेच चांगली कामगिरी केली होती. जाट समुदायाचा प्रभाव असलेल्या बागपतमध्ये रालोदने 20 पैकी 7 वॉर्डांमध्ये विजय मिळवला होता. या विजयानंतर रालोद कार्यकर्ते जल्लोष करणार होते. मात्र, अजित सिंह चौधरी यांची तब्येत बिघल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले होते.

(Rashtriya Lok Dal chief and former Union minister Ajit Singh dies of Covid-19)