
काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचा नुकताच अविवा बेग हिच्याशी साखरपुडा झाला. त्याने सोशल मीडियावरील त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून फोटो पोस्ट करत याची घोषणा केली. 29 डिसेंबर 2025 रोजी त्या दोघांची एंगेजमेंट झाली असून आता त्यांचा पहिला फोटोही समोर आलाय. प्रियांका गांधी यांनीही रेहान- अविवा या दोघांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. ‘ तुम्हा दोघांना खूप प्रेम. नेहमी एकमेकांचा आदर करा आणि 3 वर्षांचे असल्यापासून जसे चांगले मित्र राहिलात, तसेच एकत्र रहा’ अशी कॅप्शन लिहीत प्रियांका गांधी यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या फोटोवर लाखो लाईक्स आले असून लोकांनी रेहान-अविवा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रेहान -अविवा हे दोघे गेल्या 7 वर्षांपासून सोबत आहेत.
रॉबर्ट वाड्रा यांची पहिली प्रतिक्रिया
प्रियांका गांधी यांच्याप्रमाणेच रॉबर्ट वाड्रा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘ माझा मुलगा आयुष्याच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे आणि त्याला त्याचा जीवनसाथी सापडला आहे. त्या दोघांनाही आनंदाने भरलेलं, अतूट बंधनाने भरलेले, मजबूत प्रेम आणि विश्वासाने भरलेले आयुष्य मिळावे यासाठी मी मनापासून आशीर्वाद देतो. एकमेकांचा हात हातात धरून ते या सुंदर प्रवासात पुढे जात राहोत, त्यांना समृद्ध आयुष्य मिळावं ‘ अशा शब्दांता तयांनी दोघांना आशिर्वाद दिले.
रेहान आणि अविवाच्या लग्नाला दोन्ही कुटुंबांनी संमती दिली आहे. दोन्ही कुटुंबांनी या नात्याला मान्यता दिल्यानंतर राजस्थानमध्ये हा साखरपुडा पार पडला. रेहानच्या अविवाशी असलेल्या नात्याबद्दल कुटुंबातील कोणत्याही सदस्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपासून एकत्र
अवीवा बेग आणि रेहान दोघांनाही फोटोग्राफीमध्ये खूप रस आहे. ते गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. रेहानने अलीकडेच अवीवाला प्रपोज केलं आणि तिने होकार दिला. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हे लग्न ठरले. रेहान वाड्रा आणि अविवा बेग सवाई माधोपूर येथील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात एकत्र फिरताना दिसले. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील त्यांच्यासोबत होते.
रेहान वाड्रा आणि अवीवा दोघांचेही कुटुंब खूप जवळचे आहेत. रेहान याने देहरादूनमधील प्रसिद्ध दून स्कूलमध्ये शिक्षण घेतले, त्याच शाळेत माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही शिक्षण घेतले होते. नंतर त्याने लंडनला जाऊन पुढील शिक्षण घेतलं.