‘अरे, तू आहेस तरी काय? बाहेर भेट एकदा…’ कोर्टातच शिमगा, महिला न्यायाधीशाला कोणी दिली थेट धमकी, कारण तरी काय

Threaten to the Judge : दिल्लीमधील द्वारका कोर्टात एका महिला न्यायाधीशाला थेट न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच धमकी देण्यात आली. तू आहेस तरी काय? बाहेर एकदा भेट, अशा प्रकारची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अरे, तू आहेस तरी काय? बाहेर भेट एकदा... कोर्टातच शिमगा, महिला न्यायाधीशाला कोणी दिली थेट धमकी, कारण तरी काय
महिला न्यायाधीशाला धमकी
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 22, 2025 | 3:57 PM

दिल्ली येथील द्वारका कोर्टात चांगलाच राडा झाला. एका महिला न्यायाधीशाला धमकी देण्याची खळबळजनक घटना घडली. धनादेश अनादर प्रकरणात (cheque bounced) दोषी ठरवल्यानंतर एकच हंगामा सुरू झाला. न्यायालयात शेरेबाजी, अभद्र भाषा, शिव्यांनी एकच खळबळ उडाली. एका वकिलाने त्याच्या बाजूने निकाल न दिल्याच्या रागातून थेट न्यायाधीशांना धमकी आणि शिव्या दिल्या. आपल्या बाजूने निकाल न दिल्याचा राग त्याने व्यक्त केला. दरम्यान याप्रकरणातील आरोपीने न्यायाधीशांवर सामान फेकल्याचा पण आरोप करण्यात येत आहे. कोर्टाच्या 2 एप्रिलच्या आदेशात महिला न्यायाधीशाने या घटनेची नोंद केली आहे.

निवृत्त शिक्षकाचा प्रताप

63 वर्षीय आरोपी निवृत्त सरकारी शिक्षक राज सिंह आहे. तो धनादेश अनादर प्रकरणात दोषी आढळला. द्वारका कोर्टातील न्यायाधीश शिवांगी मंगला यांच्यासमोर केस सुरू होती. सुनावणीअंती आरोप निश्चिती झाल्यावर पुढील सुनावणी वेळी CRPC कलम 437ए अंतर्गत त्याला जामीनपत्र भरण्याचे निर्देश देण्यात आले. कोर्टाने निकाल देताच आरोपी आणि त्याचे वकील एकदम भडकले. त्यांनी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्‍या त्यांच्याव टिप्पणी सुरू केली. तर आरोपीने त्यांच्यावर सामान भिरकावले. दोघांविरोधात महिला आयोगात दाद मागणार असल्याचे महिला न्यायाधीश मंगला यांनी सांगितले.

तू आहेस तरी काय, बाहेर भेट एकदा

कोर्टाने 2 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार, आरोपी राज सिंह याने महिला न्यायाधीश शिवांगी मंगला यांना धमकी दिली. तू आहेस तरी काय, बाहेर भेट एकदा, तू जिवंत घरी कशी जाते तेच बघतो, अशी धमकी त्याने दिली. मंगला यांनी आरोपीविरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. मी कोणत्याही परिस्थितीत न्यायाच्या बाजूने उभी राहील. तसेच आरोपीची धमकी आणि अभद्र टीकेविरोधात योग्य ठिकाणी दाद मागेल, असे न्यायाधीश मंगला यांनी निकालपत्रात स्पष्ट केले आहे.

वकिलाला बजावली कारणे दाखवा नोटीस

न्यायाधीश शिवांगी मंगला यांनी निकालपत्रात वकीलाची चांगलीच शाळा घेतली आहे. आरोपीला दोषी ठरवल्यानंतर वकील आणि आरोपीने आपल्याला मानसिक आणि शारीरिकरित्या त्रास दिल्याचे न्यायाधीश मंगला यांनी म्हटले आहे. या दोघांनी आपल्यावर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्याचे त्या म्हणाल्या. आपण न्यायाधीशांची तक्रार करू, त्यांचा जबरदस्तीने राजीनामा घेऊ असे आरोपी म्हणाला. न्यायाधीशांनी आरोपी वकील अतुल कुमार याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.