नीट पेपर प्रकरणात सर्वात मोठा दावा, रोहित पवारांनी थेट फोटो पोस्ट केल्याने खळबळ; भाजपावर गंभीर आरोप!

नीटचा पेपर फुटल्यामुळे आता सरकारवरही टीका केली जात आहे. असे असतानाच आता आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून राज्य तसेच देशभरात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी भाजावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

नीट पेपर प्रकरणात सर्वात मोठा दावा, रोहित पवारांनी थेट फोटो पोस्ट केल्याने खळबळ; भाजपावर गंभीर आरोप!
neet paper leak
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2026 | 9:22 PM

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात नाशिक आणिअहिल्यानगरातून आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रापासून ते मध्यप्रदेश, राजस्थानपर्यंत या पेपरफुटीचे जाळे पसरल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत करूनही आता परत त्यांना पेपर द्यावे लागत असल्याने पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. नीटचा पेपर फुटल्यामुळे आता सरकारवरही टीका केली जात आहे. असे असतानाच आता आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून राज्य तसेच देशभरात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी भाजावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

रोहित पवार यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमके काय आहे?

रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नीट पेपरफुटीमध्ये राजस्थानमधील भाजपाचा नेता दिनेश बिंवाल यांचा हात असल्याचा दावा केला आहे. देशात एखादं मोठं कांड उघडकीस आलं आणि त्यात भाजप नेत्याचा समावेश नाही, असं गेल्या दहा-बारा वर्षांत क्वचितच झालं असेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. आजही देशातील 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या NEET पेपरफुटीमध्ये राजस्थानमधील भाजप नेता दिनेश बिंवाल याचा सहभाग उघड झाला असून त्याने 30 लाखात नीट पेपर विकून विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख केली. ही आहे यांची नीतिमत्ता, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घालून…

तसेच, 2024 मध्येही जो NEET घोटाळा झाला त्यावेळी NTA चे जे महासंचालक होते त्यांना भाजपने छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून बक्षीस दिलं. आताही बिंवाल याला एखादं मत्रीपद दिलं जातं की काय याकडं जनतेचं लक्ष आहे. आता यावर भाजपवाले काही बोलणार का? असा रोखठोक सवाल रोहित पवार यांनी केला आहे. भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घालून यालाही ‘क्लीन’ करणाच्या नादात सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य क्लिन करू नका म्हणजे झालं, असंही रोहित पवार आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

Follow Us