संघाच्या शतक महोत्सवी सोहळ्याची तयारी, उद्यापासून भरणाऱ्या RSS च्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत काय होणार ?
आरएसएसच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीचे आयोजन ४ - ५ जुलै रोजी होत आहे. या बैठकीत संघाच्या कामांचा विस्तार, आगामी आव्हानांवरील उत्तरं आणि शताब्दी योजनांवर चर्चा होणार आहे. सर संघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या कार्यक्रमाचा आढावाही या बैठकीत घेतला जाणार आहे.सेवा कार्य, प्रशिक्षण वर्ग आणि संघटनात्मक कार्यांवरही विस्ताराने चर्चा होणार आहे

आरएसएसच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीचे आयोजन ४ – ५ जुलै रोजी होत आहे. या बैठकीत संघाच्या कामांचा विस्तार, आगामी आव्हानांवरील उत्तरं आणि शताब्दी योजनांवर चर्चा होणार आहे. सर संघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या कार्यक्रमाचा आढावाही या बैठकीत घेतला जाणार आहे.सेवा कार्य, प्रशिक्षण वर्ग आणि संघटनात्मक कार्यांवरही विस्ताराने चर्चा होणार आहे.
संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक दरवर्षी जुलैमध्ये होत असते. या वर्षी ४, ५ आणि ६ जुलै रोजी होणाऱ्या या बैठकीत ४६ प्रांतांचे प्रांत प्रचारक सामील होणार आहेत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की या बैठकीत सर्व प्रांतांतील संघाच्या कामाच्या विस्तारासंबंधी चर्चा होत असते. येणाऱ्या समस्यांवर उपाय योजले जात असतात. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत आणि सहकार्यवाहक दत्तात्रेय होसबाळे यांच्या वर्षभरातील कार्यक्रमांचाही आढावा घेतला जाईल.
सुनील आंबेकर यांनी सांगितले की जुलैच्या या बैठकीत गेल्या तीन महिन्यात आयोजित केलेल्या संघ प्रशिक्षण वर्गाचा देखील आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. यंदा आतापर्यंत १०० प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. ४० वयापेक्षा कमी वयोगटातील ७५ वर्ग आणि ४० ते ६० वयोगटाचे २५ वर्ग आयोजित केले होते. व्यक्तीमत्व निर्माण करण्यासाठी संघ प्रशिक्षण वर्ग अतिशय महत्वाचे असतात.
बैठकीत सेवा कार्याचा आढावा घेतला जाणार
संघाच्या सेवा कार्याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. गुजरातच्या एअरपोर्ट दुर्घटना असो की पुरी येथील चेंगराचेंगरी या कार्यात बचावासाठी धावलेल्या संघाच्या स्वयंसेवकांची संख्या मोठी आहे , असेही सुनील आंबेकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की संघाच्या सर्व ६ सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय अधिकारी आणि विविध संघटनांत काम करणारे संघटनमंत्री यात सहभाग घेतील आणि त्यांच्या संघटनात्मक कार्यांची चर्चा यात होणार आहे.
शताब्दी वर्ष सोहळ्याची माहीती दिली जाणार
सुनील आंबेकर म्हणाले की, गेल्या मार्चनंतर सर्व प्रांतांनी शताब्दी वर्ष सोहळ्यासाठीचे स्वतःच्या योजना आणि आराखडे तयार केले आहेत.त्याची माहीती या बैठकीत दिली जाणार आहे. शताब्दी वर्षाचा प्रारंभ विजयादशमीच्या दिवशी २ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपुर येथून सुरु होणार आहे. आणि पुढच्या वर्षभर देशभरात विभिन्न कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
गृह संपर्क: घरा – घरात जाऊन संघाचा संदेश आणि विचार पोहचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. प्रत्येक शाखेचे स्वयंसेवक नोव्हेंबरपासून या कामाची सुरुवात करणार आहेत.
सामाजिक सद्भाव बैठक: या सामाजिक सद्भाव बैठकांचे आयोजन देशात जिल्हास्तरावर होणार आहे. हिंदू समाजातील प्रत्येक समुदायाच्या स्थानिक प्रमुख लोकांना एका जागी बैठक बोलावून सामाजिक दुष्प्रवृत्ती दूर सारुन परस्पर सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
महत्वाचे नागरिक चर्चासत्र: ऑक्टोबरपासून वर्षभर समाजातील प्रमुख व्यक्तींसोबत राष्ट्र, हिंदुत्व आणि समाज या विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जातील.
ते म्हणाले की, शताब्दी वर्षाच्या निमित्ताने तरुणांना विशेष संपर्क साधला जाईल. सरसंघचालकांच्या भेटीसाठी एक विशेष योजना आखली जाईल. दिल्ली, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सार्वजनिकरित्या विशेष संवाद कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये समाजातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रित केले जाईल. साल २०१८ मध्ये विज्ञान भवनात ज्या प्रकारचे आयोजन केले होते त्याप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केला जाईल.
