RSS Meeting: शिक्षण, धर्मांतर, घुसखोरीवर सविस्तर चर्चा, अखिल भारतीय समन्वय बैठकीची सांगता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीची पत्रकार परिषदेने सांगता झाली. या बैठकीच्या शेवटच्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

RSS Meeting: शिक्षण, धर्मांतर, घुसखोरीवर सविस्तर चर्चा, अखिल भारतीय समन्वय बैठकीची सांगता
rss meeting
| Updated on: Sep 07, 2025 | 7:21 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीची पत्रकार परिषदेने सांगता झाली. राजस्थानमधील जोधपूरमध्ये या तीन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज या बैठकीच्या शेवटच्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाच्या शताब्दी वर्षाच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच या बैठकीत झालेल्या चर्चेचीही माहिती दिली. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

सुनील आंबेकर म्हणाले की, तीन दिवसांच्या समन्वय बैठकीत शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात आले. अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघ, विद्या भारती, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, भारतीय शिक्षण मंडळ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासह इतरही विविध संघटनांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीबाबत त्यांना आलेले अनुभव सांगितले. शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी मातृभाषेतील शिक्षणावर भर दिला जात आहे. भारतीय ज्ञान परंपरा आणि शिक्षणाचे भारतीयीकरण याबाबत पुस्तकांचे पुनर्लेखन आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत देशातील सामाजिक परिस्थितीवरही चर्चा झाली. पंजाबमध्ये धर्मांतर वाढले आहे, तसेच अनेक तरुण अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकले आहेत यावर बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच सेवा भारती आणि विद्यार्थी परिषदेने सामाजिक जागरूकता आणि व्यसनमुक्ती मोहिमांबद्दल माहिती दिली. तसेच बांगलादेशातून होणारी घुसखोरी हाही एक महत्वाचा मुद्दा आहे, यासह पश्चिम बंगालमधील नागरी सुरक्षेबाबत चर्चा झाली. ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचार कमी झाला आहे, तसेच विकास वाढला आहे यावरही यावेळी चर्चा झाली.

आदिवासी भागात नक्षलवादी आणि माओवादी हिंसाचार कमी झाला असला तरी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, यावरही चर्चा झाली. तसेच वसतिगृहे आणि आदिवासी हक्कांबाबत वनवासी कल्याण आश्रमाने केलेल्या कामाचा उल्लेख यावेळी करण्यात आला. तसेच आदिवासी समाजापर्यंत भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय विचार पोहोचवण्याची गरज आहे यावरही भर देण्यात आला.

यंदा संघाचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. याबाबतच्या योजनांबद्दल माहिती देण्यात आली. पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य याबाबत विशेष कार्यक्रम चालवले जाणार आहे. शताब्दी वर्षाचे औपचारिक उद्घाटन 2 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे विजयादशमी उत्सवाने होणार आहे.

विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. याबाबत बोलताना सुनील आंबेकर म्हणाले की, ‘क्रीडा भारती महिला खेळाडूंमध्ये योग ज्ञान आणि अभ्यासाला प्रोत्साहन देत आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत महिला कार्यकर्त्यांनी 887 कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामुळे संघटनांमध्ये महिलांचा सहभाग सतत वाढत आहे.’

धर्मांतर, घुसखोरी, काशी-मथुरा यासारख्या विषयांवर बोलताना आंबेकर म्हणाले की, ‘या समस्यांचे निराकरण संघर्ष किंवा आंदोलनातून नव्हे तर कायदेशीर आणि परस्पर संवादातून होईल.’ आंबेकर यांना भाषेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असले पाहिजे आणि सर्व भारतीय भाषांचा आदर करणे आवश्यक आहे. इंग्रजीला विरोध नाही, परंतु शिक्षण आणि प्रशासनात भारतीय भाषांना योग्य स्थान मिळाले पाहिजे.’

आंबेकर यांनी पुढे बोलताना म्हणाले की, 6 सप्टेंबरच्या रात्री लोकगायक अन्वर खान यांनी गाणे सादर केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचा सत्कार केला.’ सुनील आंबेकर पुढे म्हणाले की, दिशा सकारात्मक आहे, मात्र काही विषयांवर अधिक काम करणे गरजेचे आहे. आजच्या पत्रकार परिषदेदरम्यान, जोधपूर प्रांत संघचालक हरदयाल वर्मा, ए.बी.ए. सह-प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर आणि प्रदीप जोशी हे देखील उपस्थित होते.