ट्रेनला आग लागल्याची अफवा, लोकांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्याने मालगाडीची धडक
रांची सासाराम इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि एकच गोंधळ उडाला. आग लागल्याचं कळताच अनेकांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. पण यामुळे दुसऱ्या बाजुने येणाऱ्या मालगाडीने त्यांना धडक दिली ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

कुमंदीह रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची धडक बसून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीहून सासारामला जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवा पसरली आणि एकच गोंधळ उडाला. आगी लागल्याने घाबरुन काही लोकांनी ट्रेनमधून उड्या मारल्या आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालगाडीने धडक दिल्याने लोकांना जीव गमवावा लागला. ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. ट्रेनमधून उड्या घेल्याने अनेक जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव पथकासह अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. घटना नक्षलग्रस्त भागात असल्याने प्रशासकीय पथकाला पूर्ण खबरदारी घ्यावी लागतेय. रात्रीच्या अंधारातही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये रेल्वे टीमला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घटनेनंतर गरीब रथ एक्सप्रेस लातेहारहून दिल्लीकडे रवाना झाली. गरीब रथ एक्सप्रेसमध्ये असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना ही गोष्ट कळताच त्यांची चिंता वाढली होती. पण गरीब रथ एक्स्प्रेसने छिपडोहर रेल्वे स्थानक सोडल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने सांगितले की, रांची सासाराम ट्रेनने त्या प्रवास करत होत्या. अफवा पसरल्यानंतर लोकं खाली उतरु लागली. त्यानंतर ही घटना घडली. सध्या सर्व काही शांत आहे, लोक ट्रेन उघडण्याची वाट पाहत आहेत. एका व्यक्तीने आपल्या मुलांसह खाली उडी घेतल्याने मुले गंभीर जखमी झालेत.
