Sambhajiraje Chhatrapati : गडकोटांची दुरवस्था अन् अनुचित प्रकार रोखण्यासाठी दूरगामी उपाययोजना कराव्या, संभाजीराजे छत्रपतींची मागणी

संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या फोर्ट फेडरेशन आणि पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त सहभागाने गडकोटांवर संवर्धन आणि देखभालीचे काम करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चादेखील या बैठकीत झाली.

Sambhajiraje Chhatrapati : गडकोटांची दुरवस्था अन् अनुचित प्रकार रोखण्यासाठी दूरगामी उपाययोजना कराव्या, संभाजीराजे छत्रपतींची मागणी
केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती जी. यांची संभाजीराजे छत्रपतींनी घेतली भेट
Image Credit source: Facebook
| Updated on: Jul 26, 2022 | 6:44 PM

नवी दिल्ली : राज्यातील पन्हाळगड, विजयदुर्ग अशा महत्त्वाच्या गडांवर वारंवार तटबंदी कोसळणे, बुरुज ढासळणे असे प्रकार होत आहेत. यावर दूरगामी प्रभावकारक ठरणाऱ्या उपाययोजना करणे नितांत आवश्यक आहे, असे मत संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी व्यक्त केले आहे. दिल्ली येथे छत्रपती गडकोटांसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी राज्यातील गडकोटांची होत असलेली दुरवस्था आणि काही अनुचित प्रकार याबाबतचे मुद्दे संभाजीराजे यांनी मांडले. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या (Archaeological Survey of India) महासंचालिका विद्यावती जी यांची संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाच्या मुख्यालयात भेट घेतली. रायगड (Raigad) विकास प्राधिकरणाशी निगडीत दुर्गराज रायगडावरील उत्खनन, गडावरील लाइट व्यवस्था, अद्ययावत रोपवे साठीची आवश्यक तरतूद आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली.

‘संवर्धन आणि जतन कार्यावर अधिक भर द्यावा’

संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या फोर्ट फेडरेशन आणि पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त सहभागाने गडकोटांवर संवर्धन आणि देखभालीचे काम करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चादेखील या बैठकीत झाली. याबाबत बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणजे की, पुरातत्त्व विभागामार्फत किल्ले दत्तक योजना आणि तत्सम योजनांमधून केवळ पर्यटनाच्या दृष्टीने काम केले जायचे. मात्र मूळ ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था तशीच राहायची. यामुळे पर्यटनाबरोबरच प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन आणि जतन कार्यावर अधिक भर द्यावा, यासाठी मी नेहमी पाठपुरावा करीत होतो. याचसाठी फोर्ट फेडरेशन काम करणार आहे, असे ते म्हणाले.

‘फोर्ट फेडरेशन मोलाची भूमिका’

पुरातत्त्व विभाग आणि फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून किल्ल्याची नियमित देखभाल आणि प्रत्यक्ष संवर्धनावर काम केले जाणार आहे. राज्यातील गडकोटांच्या देखभाल, जतन आणि संवर्धनामध्ये फोर्ट फेडरेशन मोलाची भूमिका पार पाडणार असून त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत, असे संभाजीराजे छत्रपती या भेटीनंतर म्हणाले. राजगडासह राज्यात अनेक ठिकाणी किल्ल्यांची दुरवस्था झाली असून त्याकडे लक्ष देण्याची मागणीही यानिमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ऐतिहासिक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा पर्यटनावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.