संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबर रोजी स्वीकारणार पदभार
RBI New Governor Sanjay Malhotra : संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असतील. बुधवारी 11 डिसेंबर रोजी नवीन गव्हर्नर म्हणून ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यांची नियुक्ती 3 वर्षांसाठी असणार आहे.

संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवे गर्व्हर्नर म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी दिली. ते विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, 11 डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील. संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती ३ वर्षांसाठी आहे. सध्या ते महसूल सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
संजय मल्होत्रा यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी आणि यूएसएच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 33 वर्षांच्या कारकिर्दीत नेतृत्व आणि उत्कृष्टता दाखवून, संजय मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) आहेत. त्यांच्या मागील असाइनमेंटमध्ये, त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते.
संजय मल्होत्रा यांच्याकडे राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या वर्तमान असाइनमेंट अंतर्गत, ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून काम पाहतील. आर्थिक जगतात ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते, कारण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी यावेळी महत्त्वपूर्ण निर्णयांची गरज आहे.
शक्तीकांत दास यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 रोजी संपणार आहे. दास यांच्या कार्यकाळात, भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक मोठे निर्णय घेतले, ज्याचा भारतीय बँकिंग प्रणाली आणि आर्थिक धोरणांवर परिणाम झाला.
