
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळाळेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये पर्यकांवर हल्ला केला जाऊ शकतो, अशी माहिती सुरक्षा एजन्सींनी दिली होती. या गुप्त माहितीमध्ये श्रीनगर आणि श्रीनगरच्या आसपासच्या भागाला दहशतवादी लक्ष्य करू शकतात, असा अंदाज सांगण्यात आला होता. प्रत्यक्ष हल्ला मात्र पहलगामच्या बैसरन घाटीमध्ये झाला. हल्ल्याची गुप्त माहिती मिळूनही नेमक्या ठिकाणाचा अंदाज न लावता आल्याने हा हल्ला झाला, अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीनगरच्या दौऱ्यावर जाणार होता. हाच दौरा लक्षात घेऊन सुरक्षा एजन्सीजने दहशतवादी पर्यकांवर हल्ला करू शकतात, अशी गुप्त माहिती दिली होती. दहशतवादी पर्यटक किंवा एखाद्या स्थळाला लक्ष्य करू शकतात, असेही या एजन्सीजने सांगितेल होते. या संवेदनशील माहितीनंतर श्रीनगर, श्रीनगरमधील हॉटेल्स, दाचीगाम राष्ट्रीय उद्यान तसेच अन्य पर्यटन स्थळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली होती. याच काळात जम्मू-काश्मीरच्या खराब हवामानामुळे नरेंद्र मोदी यांचा 18 आणि 19 एप्रिल रोजीचा दौरा रद्द करण्यात आला होता.
नरेंद्र मोदी या दोन दिवसांत हेलिकॉप्टरच्या मदतीने तीन भागांत जाणार होते. मात्र हवामान अनुकूल नसल्याने हा त्यांचा हा दौरा रद्द झाला होता. मोदींचा दौरा रद्द झाला तरी तिथले लष्कर, पोलीस तसेच सुरक्षा दलाची सतर्कता कायम होती. याच काळात जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक नलीन प्रभात चार दिवस श्रीनगरमध्ये मुक्काम ठोकून होते. त्यांचे श्रीनगर तसेच आजूबाजूच्या भागावर करडी नजर होती. 22 एप्रिल रोजी हल्ला झाला तेव्हा ते श्रीनगरहून जम्मूला गेले होते. विमानतळावर उतरताच त्यांना या हल्ल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते तत्काळ श्रीनगरला परतले होते.
दरम्यान, सुरक्षा एजन्सीजने संभाव्य हल्ल्याची माहिती दिली होती. दहशतवादी पर्यटकांना लक्ष्य करू शकतात, असेही सांगण्यात आले होते. मात्र हल्ल्याच्या नेमक्या ठिकाणाची ओळख पटू न शकल्याने हे अघटीत घडलं. हल्ल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर संरक्षण यंत्रणेने काळजी घेतली. मात्र हल्ल्याचे नेमक्या ठिकाणाची माहिती न मिळाल्यामुळे हा हल्ला झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही बाब स्वीकारली आहे. अशा प्रकारे गुप्त माहिती मिळाल्यानंतर दहापैकी 9 वेळा हल्ला होत नाही. यावेळी पर्यटकांवरील हल्ल्याची माहिती खरी होती. मात्र स्थान ओळखण्यात चूक झाली, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.