Uddhav Thackeray vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेना, तर मग…? ठाकरेंच्या वकिलाचा सर्वात मोठा युक्तिवाद काय? बाजी पलटणार?
शिवसेना आणि पक्ष चिन्हावरील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या युक्तिवादाला सडेतोड उत्तर दिले. 'एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेना, तर मग संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत का गेला नाही?' असा सवाल करत सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेची याचिका वैध असल्याचे म्हटले. अध्यक्षांच्या निर्णयावर कोर्ट पुनरावलोकन करू शकते, असेही ते म्हणाले.

शिवसेना आणि पक्ष चिन्हावरील सुनावणी दरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र, शिंदे गटाच्या वकिलांचा हा युक्तिवाद ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पूर्णपणे खोडून काढला आहे. जर एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेना आहे, संपूर्ण पक्ष म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत, तर मग संपूर्ण पक्ष शिंदेंसोबत का गेला नाही? असा तगडा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत राजन साळवी होते, दुसरीकडे राहुल नार्वेकर होते. मग मतदान शिंदे गटाच्या लोकांनी केले ते पक्षहिताचे होते का? सुनील प्रभू यांना व्हिप म्हणून पक्षाने अपॉइंट केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी भाजपचा पाठिंबा असलेल्या सरकारच्या बाजूने मतदान केलं, याकडे कपिल सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.
याचिका अजूनही व्हॅलिड
विचारधारेवरून पक्षावर दावा करणे हे शक्य नाही. मी पुन्हा सांगतो विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष होऊ शकत नाही आणि दुसरा विधिमंडळ पक्ष काढला जाऊ शकत नाही. आमदार अपात्रतेची याचिका योग्य वेळी दाखल केली होती. जेव्हा याचिका दाखल केली, तेव्हा ते सगळे आमदार होते. अजूनही ती याचिका व्हॅलिड आहे, असं सिब्बल यांनी कोर्टात स्पष्ट केलं.
आमदार अपात्र झाले तर…
आता ती टर्म संपली म्हणून त्या टर्मचा विषय संपला हे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही ती याचिका वेळेत दाखल केली होती. आमदार अपात्रता प्रकरण खूप महत्त्वाचे आहे. कारण शिंदेंचे आमदार अपात्र झाले तर आम्ही निर्णयाच्या बाजूने असू आणि आयोगाचा निर्णय चुकीचा ठरेल, असं त्यांनी म्हटलं.
महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असता
विशिष्ट वेळेता याचिका निकाली काढली पाहिजे, असं सुभाष देसाई प्रकरण सांगतं. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. जर गोष्टी वेळेत झाल्या असत्या तर महाराष्ट्राचा इतिहास वेगळा राहिला असता, असंही त्यांनी युक्तिवादात म्हटलं.
आम्ही जबाबदार नाही
अपात्रेचा निर्णय हा या प्रकरणासाठी महत्त्वाचा आहे. निर्णय न घेणे हे अन्याय केल्यासारखे होईल. कोर्टात किती वेळ जातो याचा राजकीय पक्षाशी काय संबंध? टर्म संपण्यापूर्वी निर्णय आला नाही याला आम्ही जबाबदार नाही, असं सांगतानाच कोर्ट अध्यक्षांच्या निर्णयाचे पुनरावलोकन करेल. राजकीय पक्षात फूट होऊ नये हीच 10 व्या सूचीची महत्त्वाची गोष्ट आहे. अध्यक्षांनी 10 व्या सूचीनुसार निर्णय घेतला आहे की नाही हे कार्ट पाहिल. कोर्टाला अध्यक्षांचे निर्णय तपासण्याचे अधिकार आहेत, असंही त्यांनी म्हटलं.