Shiv Sena Case Hearing Update : शिवसेना कुणाची? आजच्या सुनावणीत नव्या वकिलाची एन्ट्री, झटका कुणाला? शिंदे की ठाकरेंना?
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी आहे. शिंदे गटाचे नवे वकील मनिंदर सिंग आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करणार आहेत. त्यांचा युक्तिवाद एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता असून, लवकरच निकाल अपेक्षित आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आज नव्या वकिलाची एन्ट्री होणार आहे. आज शिंदे गटाचे वकील मनिंदर कौल हे युक्तिवाद करणार आहेत. आजच्या सुनावणीत मनिंदर सिंग हे आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. आजचा युक्तिवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मनिंदर सिंग काय बाजू मांडतात याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आज सुनावणी दरम्यान काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. आजच्या महत्त्वाच्या युक्तिवादावरच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भवितव्याचा फैसला ठरणार असल्याचंही सांगितलं जात आहे. नीरज कौल यांचा युक्तिवाद जवळपास पूर्ण झाला असला तरी कौल थोडावेळ युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र, तरीही कौल थोडावेळ बाजू मांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर आज शिंदे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग युक्तिवाद करणार आहेत. मनिंदर सिंग हे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर जोर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मनिंदर सिंग आमदार अपात्रतेसह इतर कोणत्या मुद्द्यावर जोर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी 2 वाजल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
बहुमताचा निकषच वैध
ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी मागच्या सुनावणींमध्ये जोरदार युक्तिवाद केले होते. शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात विधिमंडळातील बहुमताचा निकष अद्याप वैध असल्याचा युक्तिवाद मागच्या सुनावणीवेळी शिंदे गटाने केला होता. कोणत्याही न्यायालयीन निर्णयाने विधिमंडळातील बहुमताचा निकष पूर्णपणे बाद केलेला नाही, असा कौल यांनी युक्तिवाद केला होता. अपात्रतेचा अंतिम निर्णय होण्यापूर्वी आमदारांना अपात्र मानता येणार नाही, असा युक्तिवादही कौल यांनी केला होता.
एकच निकष बंधनकारक नाही
निवडणूक आयोगाला प्रत्येक पक्षाच्या वादासाठी एकच निकष वापरणे बंधनकारक नसल्याचं देखील कौल यांनी म्हटलं होतं. शिवसेनेची 2018ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा मुद्दा कौल यांनी वारंवार उपस्थित केला होता. आज सुनावणीवेळी कौल हे सुरुवातीला थोडावेळ युक्तिवाद करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कौल हे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर भर देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
30 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी
दरम्यान, सर्वोच्च न्यायालय शिवसेनेवरील सुनावणी 30 ऑक्टोबरपूर्वी संपवण्याची तयारी आहे. एका प्रकरणाच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ही तोंडी माहिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयात पश्चिम बंगालमधील एसआयआरची सुनावणी आली होती. ही सुनावणी त्वरीत घेण्याची विनंती वकिलांनी केली होती. त्यावर कोर्टाने आम्हाला 30 ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेवरील सुनावणी संपवायची आहे. त्यानंतर आम्ही पश्चिम बंगालच्या एसआयआरची सुनावणी घेऊ, असं तोंडी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेनेवरील सुनावणी 20 ऑक्टोबरपर्यंत संपेल आणि दिवाळीच्या सुमारास किंवा त्यानंतर शिवसेनेवरील निकाल येणार असल्याचं सांगितलं जात आहे.