ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल; संजय राऊतांना विश्वास

| Updated on: Jun 08, 2021 | 10:35 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल; संजय राऊतांना विश्वास
शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us on

नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. (shivsena leader sanjay raut reaction on modi-thackeray visits )

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर गंभीरपणे विचार करत आहेत. मराठा आरक्षणावर काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मोदींना भेटत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आहेत. या भेटीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

आरक्षणाचा मुद्दा अधिक काळ ताणला जाऊ नये

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची काल भेट झाली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक काळ ताणला जाऊ नये असं महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला वाटतं आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरे यांची भेट झाली, असं त्यांनी सांगितलं.

आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात

ओबीसी आणि मराठा नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचं वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे. कोर्टाच्या आदेशानंतर मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या अख्त्यारीत गेला आहे. त्यामुळे केंद्राच्या दरबारात हा विषय मांडणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले.

विश्वासघात झाल्याचं आम्हाला वाईट वाटतं

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. आम्हालाही विश्वासघात केल्यावर वाईट वाटतं. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिला आणि तो पाळला गेला नाही. तो आजही टोचत आहे. त्यामुळे भाजपने पत्र, दगाबाजी वगैरे यामधून आता बाहेर पडल पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. (shivsena leader sanjay raut reaction on modi-thackeray visits)

 

संबंधित बातम्या:

Modi-Thackeray meet: उद्धव ठाकरे दिल्लीत मोदींची भेट घेणार; अजितदादा, अशोक चव्हाणही सोबतीला

किरकोळ चोऱ्यामाऱ्या करुन राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजित पवार नाहीत, अजितदादांसाठी राऊतांची जोरदार बॅटिंग

उद्धव ठाकरे मोदींना भेटणार तर मराठा आरक्षणाचा मार्ग खरंच मोकळा होणार?; वाचा सविस्तर

(shivsena leader sanjay raut reaction on modi-thackeray visits )