
भारतातील प्रमुख राज्य बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात एक अनोखे गाव आहे. हवेली खरगपूर ब्लॉकमधील गंगटा पंचायतीच्या हद्दीत दूधपानिया हे गाव आहे. या गावात निसर्गाने सौंदर्य आणि हिरवळीची उधळण केली आहे. मात्र या सुंदरतेमागे वेदना दडलेली आहे. कारण या गावातील बहुतेक गावकरी 50 वर्षांचे होण्यापूर्वीच मरतात. या गावातील गावकऱ्यांचे सरासरी आयुष्य कमी होताना दिसत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विनोद बेसरा हे 56 वर्षांचे असून ते दूधपानिया गावातील सर्वात वयस्कर गावकऱ्यांपैकी एक आहेत. विनोद हे 2019 पासून अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांचे शरीर दररोज कमकुवत होत चालले आहे. ते म्हणाले की, “माझे संपूर्ण शरीर हळूहळू काम करणं बंद करत आहे. मी पाटणासह अनेक ठिकाणी उपचार घेतले, मात्र आरोग्यात सुधारणा झाली नाही. सुरुवातीला पायाला किरकोळ दुखापत झाली होतीस त्यानंतर माझे पाय आणि कंबर दोन्ही हळूहळू काम करणे बंद झाले. डॉक्टरांनी औषधे लिहून दिली, मात्र त्याचा फायदा झाला नाही.
दूधपानिया गावातील लोक गूढ आजाराला बळी पडताना दिसत आहेत. विनोद यांची पत्नी पूर्णी देवी (43), मुलगी ललिता कुमारी (27) आणि मुलगा फिलिप्स कुमार (19) हे देखील हळूहळू या आजाराला बळी पडत आहेत. पूर्णी देवी यांनी सांगितले की, मुलगी ललिताची प्रकृती झपाट्याने खालावत आहे, वयाच्या 27 व्या वर्षी ती म्हातारी दिसत आहे. या गावातील विनोद बेसरा, कमलेश्वरी मुर्मू, छोटा दुर्गा, बडा दुर्गा, रेखा देवी आणि सूर्य नारायण मुर्मू हे लोक अपंग झाले आहेत. यातील बऱ्याच लोकांचे वय 45 ते 55 वर्षांच्या दरम्यान आहे. या गावातील जवळपास 25 लोक या आजाराला बळी पडताना दिसत आहेत.
या आजाराबाबत बोलताना गावकऱ्यांना सांगितले की, ‘हा आजार वयाच्या 30 व्या वर्षी सुरू होतो. सुरुवातीला पायात आणि नंतर पाठीत वेदना होतात. कालांतराने शरीराचे कार्य हळूहळू थांबते. काही लोक उपचार घेतात मात्र त्याचा काहीच फायदा होत नाही. गेल्या वर्षी फुलमणी देवी (40), रमेश मुर्मू (30), मालती देवी (48), सलमा देवी (45), रंगलाल मरांडी (55) आणि नंदू मुर्मू (50) हे गावकरी या आजाराने मरण पावले आहेत.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, खराब पाण्यामुळे ही समस्या निर्मात होतो. पूर्वी हे लोक डोंगरावरील झरे आणि विहिरींचे पाणी पीत असत, त्यावेळी समस्या कमी होती. मात्र आता पाण्याची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्हींबाबत प्रश्नचिन्ह आहे. गंगटा पंचायतीचे सामाजिक कार्यकर्ते संजय कुमार म्हणाले यांनी, गेल्या 15 वर्षांपासून ही समस्या सातत्याने वाढत असल्याची माहिती दिली.
या गावातील लोक हालाकीचे जीवन जगतात. लोक जंगलातील लाकूड, पाने आणि झाडू विकून जगतात. सरकारने या गावासाठी वीज, पाणी आणि रस्ता उपलब्ध करून दिला आहे, मात्र रोजगार नाही. या गावाला जोडणारा मुख्य रस्ता जीर्ण झाला आहे. नियमित पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे लोक मोठ्या भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवतात.
या गंभीर आजाराच्या समस्येनंतर हवेली खरगपूर उपविभागीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध कुमार यांनी गावाची पाहणी केली. त्यांना आजारी लोकांची हाडे आणि स्नायूंमध्ये समस्या आढळली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आणि गावातील लोकांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम पाठवण्याची विनंती केली आहे.
एसडीएम राजीव रोशन यांनी म्हटले की, वैद्यकीय पथक गावात पाठवून तपासणी करण्यात आली आहे. हा गंभीर आजार भूजल आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होत असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. दरम्यान, येथील गावकऱ्यांना रोजगार नको आहे. त्यांना फक्त चांगले पाणी आणि वैद्यकीय सेवा हवी आहे. यामुळे आजाराची समस्या सुटेल असा विश्वास गावकऱ्यांना आहे.