TV9 special Report:श्रद्धा की राजकारण?, नरेंद्र मोदी देहूत अन आदित्य ठाकरे अयोध्येत, काय आहेत गणितं?.. वाचा सविस्तर

| Updated on: Jun 14, 2022 | 2:06 PM

हिंदुत्वाच्या प्रत्येक लाटेवर स्वार होण्याची संधी सोडण्याची इच्छा कोणत्याही राजकीय पक्षाला सोडता येत नाहीये. त्यातूनच राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच मिनी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीयांच्या हिंदुत्वाच्या भावनांना हात घालण्याचं काम नेतेमंडळी करताना दिसतायेत.

TV9 special Report:श्रद्धा की राजकारण?, नरेंद्र मोदी देहूत अन आदित्य ठाकरे अयोध्येत, काय आहेत गणितं?.. वाचा सविस्तर
Narendra Modi. Aaditya Thackeray
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

मुंबई – एकूण देशात हिंदुत्वाच्या वाढत्या ज्वरामुळे राजकारण आणि हिंदुत्व (politics and Hindutva)हे गेल्या काही वर्षांपासून समीकरण होत चाललेलं पाहायला मिळतंय. याच लाटेचा भाग म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (PM Narendra Modi) देहुत धार्मिक कार्यक्रमाला आले आहेत. तर शिवसेनेचे युवराज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. सद्यास्थितीत हिंदुत्वाच्या प्रत्येक लाटेवर स्वार होण्याची संधी सोडण्याची इच्छा कोणत्याही राजकीय पक्षाला सोडता येत नाहीये. त्यातूनच राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच मिनी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीयांच्या हिंदुत्वाच्या भावनांना हात घालण्याचं काम नेतेमंडळी करताना दिसतायेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देहू दौरा आणि आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा हा त्यातलाच एक भाग आहे.

महाराष्ट्र जिंकण्याचं नरेंद्र मोदींचं स्वप्न

आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपाने स्वबळावर जिंकाव्यात हे नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी उ. प्रदेश, उत्तराखंडनंतर आता महाराष्ट्रावरप लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतं आहे. राज्यात भाजपा क्रमांक १ चा पक्ष असूनही गेल्या वेळी भाजपाला सत्ता मिळालेली नाही, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मविआ सरकारने थेट केंद्र सरकारलाच आव्हान उभे केले. मविआच्या मानसिक पाठिंब्याचा फायदा इतर राज्यांत ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनाही होतोना दिसतोय. हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि मनसेही करताना राज्यात दिसते आहे. अशा स्थितीत वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून, राज्यातील मोठ्या वर्गाच्या मनाला हात घालण्याचा आणि हिंदुत्वाची साद त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न दिसतो आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणाची स्वप्ने

दुसरीकडे काका-पुतण्यांच्या असली-नकली वादाच्या उत्तरार्धात शिवसेनेचे युवजार आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर उद्या जाणार आहेत. गेल्या काही दवसांपासून सातत्याने केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करणे, इतर राज्यांत विधानसभेत अस्तित्व दाखवण्यासाठी निवडणुका लढवणे हा शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला राष्ट्रीय नेतृत्वाची स्वप्ने पडू लागली आहेत. अशा स्थितीत अयोध्या दौऱ्यातून राष्ट्रपती निवडणुकीआधी राष्ट्रीय पातळीवर चर्चेत येण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना यांचा संघर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच होईल, अशी शक्यता आहे. अशा स्थितीत अयोध्या दौरा करुन श्रद्धेच्या निमित्तानं हिंदूत्व सोडलेलं नाही, हा संदेशही शिवसेनेला मतदारांना द्यायचा असावा.

हे सुद्धा वाचा

हिंदुत्वाचा वाढता जोर

१९९२ साली बाबरी ढाचा पडल्यानंतर देशात हिंदुत्वाचे राजकारण सुरु झाले. त्या लाटेवर आरुढ झालेल्या भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना त्याचा फायदा मिळाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या निमित्ताने सत्तेची फळं त्यांना चाखायला मिळाली. २०१४ पासून देशात नरेंद्र मोदींना पाठिंब्याच्या रुपाने अशीच हिंदुत्वाची लाट पसरलेली आहे. यात प्रत्येक पक्षाला त्याचे हिंदुत्व सिद्ध करावे लागते आहे. राहुल गांधी यांचे जानवे असो वा ममता दीदींचे दुर्गास्तोत्र. अरविंद केजरीवाल यांनाही हनुमान चालिसा पठण सार्वजनिक करावे लागत आहे. राज्यातही मनसेने उचललेला भोंग्याचा वाद असो. किंवा शिवसेना सासत्याने करत असलेली राम नामाचा जप असो. यातून प्रत्येक पक्ष आप आपल्यापरिने आपले हिंदुत्व मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. राष्ट्रवादीही यात मागे नाही. रोहित पवारांचा अयोध्या दौरा आणि शरद पवारांचे बाहेरुन दगडूशेट दर्शन हाही याच सगळ्यातील भाग म्हणावा लागेल. तूर्तास हिंदुत्व हेच राजकारण आणि सत्तेचे एकचलनी नाणे आहे, हे राजकीय पक्षांच्या लक्षात आलेले आहे.