
ISI Spy in Punjab: पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसला (आयएसआय) गुप्त लष्करी माहिती देण्याच्या प्रकरणात एका जवानाला अटक झाली आहे. भारतीय लष्करात कार्यरत असणाऱ्या जवान अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी देविंदर सिंग याला अटक केली आहे. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील निहालगड येथील तो रहिवासी आहे. त्याला १४ जुलै रोजी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथून अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून देशात विविध भागातून आयएसआयसाठी काम करणारे नेटवर्कमधील अनेकांना अटक झाली आहे.
हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या माजी सैनिक गुरप्रीत सिंग उर्फ गुरी किंवा फौजी याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. गुरप्रीत सिंग यांची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. फिरोजपूर तुरुंगात असताना देविंदर लष्कराची संवेदनशील कागदपत्रे मिळवण्यात सहभागी होता. या कागदपत्रांमध्ये गोपनीय माहिती असल्याचा आरोप आहे, जी त्याने पाकिस्तानच्या आयएसआयला दिली.
देविंदर सिंग याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली. देविंदर आणि गुरप्रीत यांची पहिली भेट २०१७ मध्ये पुण्यातील एका लष्करी छावणीत प्रशिक्षणादरम्यान झाली होती, असे तपासात दिसून आले. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क कायम राहिला. काही कालावधीनंतर दोघांनाही सिक्कीम आणि जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले.
भारतीय सैन्यात असताना दोघांनाही गोपनीय लष्करी माहिती मिळत होती. त्यापैकी काही माहिती गुरप्रीत याने आयएसआयला दिल्याचा आरोप आहे. गुप्तहेर नेटवर्कमध्ये देविंदर याची नेमकी भूमिका अजूनही तपासाधीन आहे. पोलीस अधिकारी रवजोत कौर ग्रेवाल म्हणाल्या की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता रवजोत यांनी व्यक्त केली.