
दिल्ली हाय कोर्टाकडून 14 ऑक्टोबरला गुगलला महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे की, सद्गुरूंच्या एआय –जनरेटेड प्रतिमा वापरून बनावट जाहिराती तयार करण्यात येत आहेत, अशा जाहिरातींचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अशा बनावट जाहिरातींना आळा घालावा, अशा बनावट जाहिरातींचा प्रसार रोखण्यात यावा. सद्गुरू आणि ईशा फाउंडेशनच्या वतीनं याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर दिल्ली हाय कोर्टाकडून गुगलला हे आदेश देण्यात आले आहेत.
इशा फाउंडेशनने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं की, सद्गुरूंच्या एआय –जनरेटेड प्रतिमा वापरून बनावट जाहिराती तयार करण्यात येत आहेत, अशा बनावट व्हिडीओच्या माध्यमातून सद्गुरूंच्या नावाचा आणि छायाचित्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे. ज्यामध्ये सद्गुरूंच्या अटकेच्या खोट्या दाव्याचा देखील समावेश आहे. मात्र अशा फेक जाहिरातीवर प्रतिंबंध घालण्यास गुगल अपयशी ठरत आहे.
न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण निर्देश
न्यायाधीश मनमीत प्रीतम सिंग यांच्या एकल खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली, या सुनावणीवेळी न्यायालयाकडून गुगलला महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये न्यायालयानं म्हटलं आहे की, सद्गुरूंच्या अटकेचा खोटा दावा करणाऱ्या जाहिराती आणि व्हिडीओचे प्रकाश तातडीने थांबवावे, त्यासाठी गुगलने आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. जर तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा असतील, तर त्याची कारणे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र कंपनीने न्यायालयात सादर करावं. या प्रकरणावर गुगलने इशा फाउंडेशनला भेटून संयुक्तपणे तोडगा काढावा, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान यावेळी न्यायालयामध्ये गुगलची जाहिरात धोरणाबाबत असलेली पॉलीस देखील सांगण्यात आली, अटक किंवा मृत्यूसारख्या नकारात्मक घटनांचा फायदा घेणाऱ्या, क्लिकबेट जाहिराती प्रकाशित करण्याविरुद्ध गुगलचे धोरण आहे, परंतु त्याचे पालन केले जात नाही, नियमांनुसार गुगलला पूर्वी काढून टाकण्यात आलेल्या माहितीचा मजकूर स्वयंचलितपणे ओळखण्यासाठी तंत्रज्ञान -आधारित उपाययोजना राबवणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद यावेळी न्यायालयात करण्यात आला.
दरम्यान यापूर्वी देखील 30 मे 2025 रोजी दिल्ली हाय कोर्टाकडून सद्गुरूंच्या एआय –जनरेटेड प्रतिमा वापरून जे बनावट व्हिडीओ आणि जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत, त्या हटवण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्यानंतर देखील युट्यूब आणि गुगलवर अशा जाहिरातींचं प्रमाण वाढल्याचा दावा देखील इशा फाउंडेशनकडून करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना इशा फाउंडेशनने म्हटलं आहे की, सद्गुरू यांच्या अटकेचा खोटा दावा करण्यात आला आहे, त्यामुळे या दाव्याची पडताळणी करण्यासाठी हजारो स्वयंसेवक आमच्याशी संपर्क साधत आहेत. अशा बनावट आणि फेक व्हिडीओमुळे सद्गुरूंच्या नावाची बदनामी होत आहे, तसेच त्यांच्या सुरू असलेल्या कार्यात अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे अशा फेक आणि बनावट व्हिडीओंपासून सावध रहावं, तसेच असे व्हिडीओ आढळून आल्यास त्याची माहिती द्यावी असं आवाहन इशा फाउंडेशनच्या वतीनं जनतेला करण्यात आलं आहे.