महात्मा गांधीही ब्रिटिशांना…सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणात कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं!

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली.

महात्मा गांधीही ब्रिटिशांना...सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणात कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं!
supreme court and rahul gandhi
| Updated on: Apr 25, 2025 | 5:30 PM

Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (25 एप्रिल) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चांगलंच फटकारलं. यापुढे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य सैनिकांबाबत अशी विधानं करू नयेत. तसं केल्यास न्यायालय त्याची स्वत:हून दखल घेईल, अशी तंबी न्यायालयाने राहुल गांधी यांना दिली आहे.

न्यायालय नेमकं काय म्हणालं?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. सावरकरांवर केलेल्या टिप्पणींच्या प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. कनिष्ठ न्यायालयांत त्यांच्याविरोधात चाललेल्या खटल्यावरील कारवाईला सर्वोच्च न्यालयाने स्थगिती दिली आहे. असे असले तरी आम्ही स्वातंत्र्यसैनिकांवरील अशा प्रकारच्या टिप्पण्या खपवून घेणार नाही, असेही न्यायालयाने राहुल गांधी यांना बजावून सांगितले. अलाहाबाद येथील एका कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना याच प्रकरणात समन्स जारी केले होते. यालाच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायालय काय म्हणालं?

राहुल गांधी यांच्याविरोधातील प्रकरणांवर दोन्ही बाजू जाणून घेताना न्यायमूर्ती दीपांकर दत्ता म्हणाले की, “तुम्ही एक राजकीय पक्षाचे नेते आहात. तुम्ही अशा प्रकारची टिप्पणी का करता? महाराष्ट्रात वीर सावरकरांची पूजा केली जाते. तिथे जाऊन तुम्ही विधानं करता. तुम्ही असे करू नये,” असे न्यायालयाने राहुल गांधींना बजावले.

महात्मा गांधी यांनीदेखील ब्रिटिशांसोबत…

तसेच न्यायालयाने राहुल गांधी यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनाही काही प्रश्न विचारले. “महात्मा गांधी यांनीदेखील ब्रिटिशांसोबत पत्रव्यवहार करताना तुमचा विश्वासू सेवक (your faithful servant) लिहिलेलं आहे. त्यांच्या आजी म्हणजेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील पत्रांत सावरकर यांचे स्वातंत्र्यसैनिक म्हणून कौतुक केलेले आहे, हे राहुल गांधी यांना माहिती नाही का?” असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केले.

नेमके प्रकर काय होते?

दरम्यान, राहुल गांधी यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली अलाहाबादमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तेथील जिल्हा न्यायालयाने राहुल गांधींना समन्स पाठवले होते. त्याला विरोध करत राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दाद मागितली होती. उच्च न्यायालयानेही हे समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.