रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘स्वरेल’ सुपरअ‍ॅपच्या मदतीने सगळ्या सुविधा आता एका क्लिकवर!

भारतीय रेल्वेचं नवं सुपरअ‍ॅप ‘स्वरेल’ एकाच ठिकाणी तिकीट बुकिंग, ट्रेन स्टेटस, जेवण ऑर्डर, तक्रारी यांसारख्या सर्व सेवा देणार आहे. ज्यामुळे आता वेगवेगळी अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘स्वरेल’ सुपरअ‍ॅपच्या मदतीने सगळ्या सुविधा आता एका क्लिकवर!
| Edited By: | Updated on: May 01, 2025 | 12:47 AM

भारतीय रेल्वे ही देशाची जीवनरेखा आहे, आणि दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेच्या सेवांचा वापर करतात. पण आतापर्यंत तिकीट बुकिंग, ट्रेन स्टेटस तपासणं किंवा तक्रारी नोंदवणं यासाठी वेगवेगळी अ‍ॅप्स वापरावी लागत होती. यामुळे प्रवाशांना गोंधळ व्हायचा आणि मोबाइलमधील जागाही भरून जायची. स्वरेल अ‍ॅप हे सगळं एकाच ठिकाणी आणून प्रवाशांचं आयुष्य सोपं करत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना, ज्यांच्याकडे मर्यादित इंटरनेट किंवा स्मार्टफोन स्टोरेज आहे, त्यांना याचा खूप फायदा होईल.

रेल्वे मंत्रालयाचं हे पाऊल ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेच्या दिशेने महत्त्वाचं आहे. सध्या भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींहून जास्त आहे, आणि त्यापैकी ७०% लोक अँड्रॉइड फोन वापरतात. अशा वेळी एकाच अ‍ॅपवर सगळ्या रेल्वे सेवा देणं हे प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी गेमचेंजर ठरू शकतं.

‘स्वरेल’ : सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) ने विकसित केलेलं ‘स्वरेल’ हे अ‍ॅप सध्या अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी बीटा आवृत्तीत उपलब्ध आहे. यामुळे IRCTC रेल कनेक्ट, UTS मोबाईल अ‍ॅप आणि रेल मदद यांसारख्या सेवांसाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सची गरज भासणार नाही.

प्रवाशांसाठी या अ‍ॅपमध्ये काय आहे खास?

तिकीट बुकिंग : रिझर्व्ह्ड, अनरिझर्व्ह्ड आणि प्लॅटफॉर्म तिकीट अगदी सहज बुक करता येणार.

ट्रेन आणि PNR स्टेटस : एका क्लिकवर ट्रेनचं वेळापत्रक, थांबे आणि तुमचं तिकीट स्थिती तपासता येईल.

जेवण ऑर्डर : प्रवासात चविष्ट जेवण मागवण्याची सुविधा.

पार्सल आणि मालवाहतूक सेवा : सामान व माल वाहतुकीसाठी सहज माहिती आणि बुकिंग.

रेल मदद : कुठलीही समस्या किंवा तक्रार थेट अ‍ॅपमधून नोंदवता येणार.

सिंगल साइन

‘स्वरेल’ अ‍ॅपचं आणखी एक आकर्षण म्हणजे सिंगल साइन-ऑन सुविधा. यामुळे IRCTC किंवा UTS चे आधीचे लॉगिन तपशील वापरून एकदाच लॉगिन केल्यावर तुम्हाला सगळ्या सेवांमध्ये फेरप्रवेश करता येतो. याशिवाय, बायोमेट्रिक, एम-पिन सारखे सुरक्षित लॉगिन पर्याय उपलब्ध असल्याने डेटा सुरक्षित राहतो.

असा वापरा ‘स्वरेल’ अ‍ॅप

1. गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरून ‘स्वरेल’ अ‍ॅप डाउनलोड करा.

2. तुमचे IRCTC किंवा UTS लॉगिन तपशील वापरून लॉगिन करा किंवा नवीन खाते तयार करा.

3. अ‍ॅप वापरल्यानंतर तुमचा अनुभव आणि अभिप्राय रेल्वे मंत्रालयाला पाठवा, जेणेकरून अंतिम आवृत्ती आणखी परिपूर्ण बनवता येईल.

रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की, युजर्सच्या अभिप्रायानंतर आणि सुधारित चाचणीनंतर हे अ‍ॅप लवकरच सर्वांसाठी अधिकृतपणे लाँच होणार आहे.

तुमचं रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर आणि डिजिटल होणार आहे, तर मग वाट कसली पाहता? ‘स्वरेल’ डाउनलोड करा आणि तुमचा प्रवास करा अधिक स्मार्ट!