मुख्यमंत्रीपद मिळालं पण कुटुंब दुरावलं..; थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी-मुलांनी फिरवली पाठ
अभिनेते आणि टीव्हीकेचे प्रमुख सी. जोसेफ विजय ऊर्फ थलपती विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईमधल्या नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. परंतु या सोहळ्याला विजय यांची पत्नी आणि मुलं अनुपस्थित होते.

तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि तमिळगा वेत्री कझमगचे (टीव्हीके) प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आज (रविवारी) तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईमधल्या नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राहुल गांधीसुद्धा मंचावर विजय यांच्यासोबत उपस्थित होते. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये विजय यांचे आई-वडील आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन हजर होते. सर्वांच्या नजरा त्रिशाच्या उपस्थितीकडे खिळल्या होत्या. कारण गेल्या काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या सर्वांत विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगम आणि दोन्ही मुलं अनुपस्थित होते. काही महिन्यांपूर्वीच विजय यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डीएमके आणि एआयएडीमके या दोन मोठ्या पक्षांना त्यांनी मात दिली. विजय यांच्यासाठी ही खूप मोठी बाब आहे. पक्षाला मिळालेल्या या यशानंतर विजय यांच्या कुटुंबीयांनी आनंद साजरा केला. तर त्रिशानेही त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. परंतु या सर्वांत विजय यांची पत्नी आणु मुलं कुठेच दिसली नाहीत. विजय यांनी निवडणूक जिंकल्यानंतरही संगीता किंवा मुलांची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता शपथविधी सोहळ्यालाही त्यांची अनुपस्थिती असल्यामुळे संगीता आणि मुलं विजय यांच्यापासून दुरावल्याचं स्पष्ट दिसत आहे.
#WATCH | Chennai: After taking oath as the Chief Minister of Tamil Nadu, Tamilaga Vettri Kazhagam (TVK) Chief C Joseph Vijay felicitated Tamil Nadu Governor Rajendra Vishwanath Arlekar at the Jawaharlal Nehru Stadium in Chennai. pic.twitter.com/ag7KbStGNA
— ANI (@ANI) May 10, 2026
दुसरीकडे विजय यांचा मुलगा जेसन संजय याने वडिलांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचंही म्हटलं जात आहे. परंतु जेसन संजय याआधी विजय यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत होता की नाही, हे मात्र स्पष्ट नाही. जेसन संजयचा जन्म 2000 मध्ये झाला असून तो आता 26 वर्षांचा आहे. जेसनला दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करायचं आहे, पण त्याने वडिलांचं आडनाव सोडण्याचाही निर्णय घेतला आहे.
टीव्हीकेच्या यशानंतर फक्त त्रिशाच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींपासून ते त्यांच्या लाखो चाहत्यांपर्यंत, अनेकांनी जल्लोष साजरा केला. रश्मिका मंदाना, नयनतारा, कमल हासन, रजनीकांत यांसारख्या सेलिब्रिटींनी विजय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु त्यांचा मुलगा, मुलगी आणि पत्नी संगीता मात्र या सर्व जल्लोषापासून दूर होते.