विरोधी पक्षाला पुन्हा मोठा हादरा; 5 माजी मंत्री, 15 माजी आमदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार, राजकारण 360 डिग्री फिरणार

tamilnadu politics : तामिळनाडूत एआयडीएमके पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एआयडीएमके पक्षाचे दिग्गज नेते आज टीव्हीके पक्षात प्रवेश करतील.

विरोधी पक्षाला पुन्हा मोठा हादरा; 5 माजी मंत्री, 15 माजी आमदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार, राजकारण 360 डिग्री फिरणार
| Updated on: Jul 02, 2026 | 9:19 AM

तामिळनाडूत थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष सत्तेत आल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थलपती विजय यांची राजकीय एन्ट्री झाल्याने प्रस्थापित पक्षांना मोठा हादरा बसला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याची किमया दाखवली. त्यानंतर आता विरोधी पक्षातील अनेक नेते टीव्हीके पक्षाच्या वाटेवर आहेत. कमीत कमी 5 माजी मंत्री, 15 माजी आमदार आणि शेकडे कार्यकर्ते टीव्हीके पक्षात सामील होणार आहेत. या पक्ष प्रवेशामुळे तामिळनाडूतील राजकारण 360 डिग्री फिरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्हीके पक्षात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये माजी मंत्री सी. विजयभास्कर, एम. आर. विजयभास्कर, एमएसएम आनंदन, माजी मंत्री एस. एस. वलारमथी यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच एम. के. अलागिरी यांची मुलगी कायलविझी ही देखील मल्लापुरममध्ये होणाऱ्या सोहळ्यात टीव्हीके पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतनंतर एआयडीएमके पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.

करूर आणि पुदुक्कोट्टई येथील एआयडीएमके पक्षाचे पदाधिकाऱ्यांसहित अनेक माजी आमदार, कार्यकर्ते टीव्हीके पक्षात प्रवेश करणार आहेत. तामिळनाडूतील राजकीय दिशा ओळखून अनेक नेत्यांनी पक्ष बदलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी एमआर विजयभास्कर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर सी विजयभास्कर यांनी विधानसभेचं सदस्यत्व आणि एआयडीएमके पक्ष सोडला आहे.

माजी मंत्र्याचा पलानीस्वामी यांच्यावर निशाणा  

माजी मंत्री एमआर विजयभास्कर यांनी एआयडीएमके पक्षातील प्रमुख पलानीस्वामी यांच्यावर टीका करताना म्हटलं की, पलानीस्वामी तुम्ही जो निर्णय घेतला, आम्ही फक्त त्या निर्णयाचा विरोध करत होतो. तुमच्या नेतृत्वाचा नाही. तुम्हाला या आंदोलनाचे सचिव बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. परंतु आमचा विरोध आणि कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता आमच्या आंदोलनाला संकटात टाकून दिलं आहे. आज दु:खद मनाने तुमची साथ सोडावी लागत आहे, असे माजी मंत्री एमआर यांनी सांगितले.

Follow Us