CM थलपती विजय बॅकफूटवर, जवळच्या लोकांनी दिला मोठा इशारा; नेमकं काय घडलं?
CM थलपती विजय बॅकफूटवर गेले आहेत. तामिळनाडूमधील जवळच्या लोकांनी मोठा इशारा दिल्यानंतर तामिळनाडू सरकार बॅकफुटवर गेल्याचे पाहायला मिळालं.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि त्यांचं सरकार अडचणीत सापडलं आहे. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी चेन्नईच्या पट्टिनापक्कम येथे नवीन प्रशासकीय इमारत आणि विधानसभा संकुल बांधण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विजय सरकारला पाठिंबा देणारे पक्ष आणि विरोधी पक्षाच्या विरोधानंतर त्यांनी तडकाफडकी निर्णय मागे घेतला आहे. विरोधानंतर तामिळनाडू सरकारमधील मंत्री आधव अर्जुन यानी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही याबाबत अद्याप कोणतही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
थलपती विजय सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जाणारे आधव अर्जुन यांनी राजकीय पक्षांवर विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केला. या प्रकल्पाबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत फक्त एकच आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री विजय हा प्रकल्प सुरू करण्याआधी डीपीआर रिपोर्ट पाहतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. आधव अर्जुन यांनी पुढे सांगितले की, आम्ही पट्टिनापक्कम येथे प्रशासकीय इमारती बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु विरोधकांकडून राजकारण केलं जात आहे. आम्ही याबाबत फक्त एक सरकारी आदेश जारी केला. याबाबत डीपीआर तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री विजय हे प्रशासकीय इमारत तयार करायची की नाही, याबाबत निर्णय घेतील.
या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांना संबोधित करताना मंत्री आधव अर्जुन म्हणाले, ‘मी आश्वासित व्यक्त करतो, कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. प्रिय मच्छिमारांनो मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. या प्रकल्पामुळे कोणाला आक्षेप नाही ना, याची चाचपणी केली जात आहे. परंतु राजकीय पक्ष यावर लगेच राजकारण करू लागले आहेत’. थलपती विजय यांच्या सरकारला पाठिंबा देणारे डावे पक्ष सीपीआय (एम) या पक्षाने थेट पाठिंबा मागे घेण्याचा इशारा दिला. त्यांनी म्हटलं की, प्रशासकीय इमारत बांधण्याचाही निर्णय मागे घेतला पाहिजे. सीपीआय (एम) पक्षाचे राज्य सचिव पी. षणमुगम यांनी म्हटलं की, तामिळनाडू सरकारने कोणताही निर्णय हा लोकशाही पद्धतीने घेतला पाहिजे. याबाबत थलपती विजय सरकार फेरविचार करणार नाही, तर आम्ही सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेऊ, अशा इशारा डाव्या पक्षांनी दिला
