
केरळातील एक शिक्षक दररोज आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कदलुंदी नदी पोहून शाळेत जातो. गेल्या दोन दशकापासून हा शिक्षक अशा प्रकारे नदी पोहून शाळेत जात आहे. रोज आपले शर्ट आणि चपला काढून प्लास्टीकच्या पिशवीत ठेवायच्या आणि नंतर ही पिशवी डोक्यावर ठेवून हाताने नदी पोहून पार करायची हा या शिक्षकाचा नित्यक्रम बनला आहे.या शिक्षकाचे नाव अब्दुल मलिक आहे. अब्दुल मलिक मलप्पुरम जिल्ह्यातील पदिन्जत्तुमुरी गावचे रहिवासी आहेत.ते गणिताचे शिक्षक आहेत. ते मलप्पुरमच्या मुस्लीम लोअर प्रायमरी स्कूलमध्ये नदी पोहून पोहचतात.
नदी पोहून पार केल्याने अब्दुल यांची सुमारे 12 किलोमीटरची पायपीठ वाचते. शिक्षकी पेशाप्रती त्यांच्या समर्पणाने संपूर्ण देशात त्यांना प्रेरणेचे स्थान आपोआप मिळाले आहे. ते त्यांची पुस्तके आणि कपडे प्लास्टीकच्या पिशवीत ठेवून रोज नदी पोहून शाळेत जातात. अब्दुल मलिक पर्यावरणावर खूप प्रेम आहे. ते नदी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्वही करतात.
मलिक त्यांच्या विद्यार्थ्यांनी निसर्गाचा सन्मान करायला शिकवतात. साल १९९४ पासून अब्दुल मलिक यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही.त्यांनी अनेक बस बदलून तीन तासांचा १२ किलोमीटरचा प्रवास करण्याऐवजी हा पोहत कडालुंडी नदी पार करण्याचा शॉर्टकट निवडला आहे. दररोज सकाळी ते आपली पुस्तके, दुपारचे जेवण आणि कपडे एका प्लास्टीकच्या बॅगेत भरुन, त्यांना टायर ट्युबला बांधून ठेवतात, त्यानंतर ते नदी पार करतात.
मान्सूनमध्येही त्यांचा हा क्रम चुकलेला नाही. नदीला पुर असूनही त्यांचा नित्यक्रम चुकलेला नाही. मलिक यांनी एका मुलाखती सांगितले की बसने शाळेत जायला खूप वेळ लागतो. बसची वेळही निश्चित नसते. अशा परिवहन व्यवस्थेवर अवलंबून राहाण्यापेक्षा पोहत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. रोज नदी पोहत जायला त्यांना १५ ते ३० मिनिटे लागतात. २० वर्षात त्यांनी एक दिवसही खाडा केलेला नाही.
विद्यार्थी त्यांना प्रेमाने त्यांना ‘ट्युब मास्तर’ म्हणून बोलवतात. मलिक यांची प्रतिबद्धता शिक्षण देण्याहून अधिक आहे. मलिक आपल्या विद्यार्थ्यांकडून कडालुंडी नदीची नियमित स्वच्छता करत असतात. विद्यार्थ्यांच्या मदतीने नदीतील प्लास्टीक कचरा आणि अन्य घाण ते स्वच्छ करतात. त्यातून निसर्गावर त्यांचे प्रेम आणि जबाबदारी दिसून येते. मलिक पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांना पोहायला देखील शिकवतात.
स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी मलिक यांच्या मेहनतीची प्रशंसा केली आहे. शिक्षण अधिकारी एस. राजीव यांनी सांगितले की मलिक सर केवळ शिक्षणाप्रती सर्मपणासाठी नव्हे तर पर्यावरणाच्याबद्दल देखील त्यांच्या सक्रीयतेमुळे एक आदर्श आहेत. ते विद्यार्थ्यांना आणि अन्य शिक्षकांना समान रुपाने प्रेरित करत असतात. सोशल मीडियामुळे त्यांच्या या कार्याची माहिती जगभर पोहचली आहे.