दोन्ही बाजुंनी बंदुका रोखलेल्या, मोठ्या भावाचं लहान भावाला आवाहन आणि एका अतिरेक्याचं सरेंडर, काश्मिरमधली थरारक बातमी

| Updated on: Jan 30, 2021 | 8:30 PM

अतिरेक्याच्या भावाने भावनिक साद दिल्यानंतर दोन अतिरेक्यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं (terrorist surrendered to Police after his brother emotionally appeal).

दोन्ही बाजुंनी बंदुका रोखलेल्या, मोठ्या भावाचं लहान भावाला आवाहन आणि एका अतिरेक्याचं सरेंडर, काश्मिरमधली थरारक बातमी
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली. या चकमकीदरम्यान एका अतिरेक्याच्या भावाने भावनिक साद दिल्यानंतर दोन अतिरेक्यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पुलवामाच्या काकापोरा येथील लेलहार या भागात हा सर्व प्रकार घडला. संबंधित अतिरेक्यांचं नाव अकील अहमद लोन आणि रउफ उल इस्लाम असं असल्याचं समोर आलं आहे (terrorist surrendered to Police after his brother emotionally appeal).

सुरक्षा दलांना लेलहार भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली. पोलीस आणि जवानांनी तिथे जाऊन सर्च ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरु असताना अतिरेक्यांनी अचानक मध्यरात्री पोलिसांवर गोळीबार सुरु केला. त्यामुळे या सर्च ऑपरेशनचं रुपांतर चकमकीत झालं. पोलिसांना गोळीबार करणारे अतिरेकी त्या भागातील एका गावाचेच तरुण असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी त्या तरुणाच्या कुटुंबियांना समजवत सरेंडर करण्याचं आवाहन करण्यास सांगितलं. त्यानंतर अकील अहमद लोन या अतिरेक्याच्या मोठ्या भावाने घटनास्थळी जावून आपल्या लहान भावाला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचं आवाहन केलं.

“अकील, मी साहबा, तुझा भाऊ! कृपया करुन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन कर, सरेंजर हो. जर तू स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करशील तर मी देखील इथेच आहे. पोलीस तुला बाहेर बोलवत आहेत आणि ते तुझी वाट बघत आहेत. जर तुम्ही सगळे स्वत: ला पोलिसांच्या स्वाधीन करु इच्छित असाल तर ते तुमच्यावर फायरिंग करणार नाहीत. तुम्हीदेखील तिकडून फायरिंग करु नका. हत्यारं खिडकीतून बाहेर फेकून द्या आणि हाथ वर करुन शांततेत बाहेर या. इथे काकापोरा कॅम्पचे रहमान भाई आणि पुलवमाचे एसपी साहेब उपस्थित आहेत. हत्यारं फेका आणि बाहेर या. तुम्हाला कुणीही काही करणार नाही”, असं आवाहन साहबाने केलं.

“जर तुला तसं वाटत असेल तर मी स्वत: गेटपर्यंत येतो. माझ्यासोबत एकही सैनिक असणार नाही. त्यानंतर तू स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन कर. ते अजूनही म्हणत आहेत की, आम्हाला त्यांना मारण्याची इच्छा नाही. त्यासाठी फायरिंग रोकण्यात आली आहे. लवकर बाहेर या आणि पोलिसांच्या स्वाधीन व्हा. तुला आई-वडिलांचं तर माहिती आहे, ते जिवंतपणीच मेले आहेत. आपण याआधीच आपल्या एका भावाला गमवलं आहे. आता संपूर्ण कुटुंबच घालवायचं आहे का?”, असा भावनिक सवाल करत मोठ्या भावाने अतिरेक्याला पोलिसांच्या स्वाधीन होण्यास सांगितलं. अखेर मोठ्या भावाच्या आवाहनानंतर अकीलने स्वत:ली सरेंडक केलं.

हेही वाचा : जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर