हा धादांत खोटेपणा.., थलपती विजय यांच्या पहिल्या भाषणावर भडकला वर्गमित्र

तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनल्यानंतर थलपती विजय यांनी भाषणात गरिबी आणि उपासमारीचा उल्लेख केला. यावरून आता त्यांच्या एका वर्गमित्राने टीका केली आहे. विजय हे धादांत खोटे बोलत आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

हा धादांत खोटेपणा.., थलपती विजय यांच्या पहिल्या भाषणावर भडकला वर्गमित्र
Thalapathy Vijay
Image Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2026 | 10:50 AM

तमिळगा वेत्री कझगमचे (टीव्हीके) प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते सी. जोसेफ विजय यांनी रविवारी 10 मे रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांच्या रुपात केलेल्या पहिल्याच भाषणात विजय म्हणाले की, ते गरिबी आणि भूकेला समजतात. त्यांच्या या दाव्यावर आता शाळेतल्या एका वर्गमित्राने टिप्पणी केली आहे. विजय यांच्यासोबत इयत्ता तिसरीमध्ये एकाच वर्गात शिकलेले आणि नेटफ्लिक्सवरील ‘डी कपल्ड’चे निर्माते मनु जोसेफ यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. विजय यांनी गरिबीबद्दल केलेला दावा किती खोटा आहे, हे त्यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

काय म्हणाले मनु?

‘तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या पहिल्या भाषणात विजय म्हणाले की, ते गरिबीत वाढले आणि भूक म्हणजे काय हे त्यांना नीट माहीत आहे. हा मूर्खपणा आहे कारण लोयोला शाळेत तिसऱ्या इयत्तेत ते माझे क्लासमेट (वर्गमित्र) होते. त्यांचे वडील निर्माते होते आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी त्यांच्या मुलाचंही करिअर सेट केलं होतं. बहुतांश चित्रपट निर्मात्यांप्रमाणे त्यांच्या वडिलांनीही आर्थिक अडचणींचा काळ पाहिला असेल, हे शक्य आहे. पण ती काही तमिळ दर्जाची गरिबी नाही. अनेक श्रीमंत मुलं कंगाल असण्याला गरिबी समजतात. या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

मनु हे माजी पत्रकार आणि लेखकसुद्धा आहेत. त्यांचे वडील जोसेफ मदापल्ली यांनी ‘थोरनम’ या मल्याळम चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात विजय यांनी गरिबी आणि उपासमारीबद्दल भाष्य केलं होतं. मी एका साध्या चित्रपट दिग्दर्शकाचा मुलगा असून कठोर परिश्रमातून चित्रपटसृष्टीत यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, असं ते म्हणाले. “गरिबी आणि भूक म्हणजे काय असतं हे मला माहीत आहे. मी राजघराण्यातील नाही, मी तुमच्यासारखाच, तुमच्यापैकीच एक आहे. मी तुमच्या मुलासारखा, तुमच्या भावासारखा आहे”, असं ते भाषणात म्हणाले होते. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. काँग्रेस, सीपीआय, सीपीआय-एम, विदुथलाई चिरुथैगल कची (व्हीसीके) आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययुएमएल) यांच्या पाठिंब्याने विजय यांनी बहुमत सिद्ध केलं आणि तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us