थलपती विजय यांच्यासंर्भातील भाकीत खरं ठरलं, अन् ज्योतिषाची लॉटरी, सरकारमध्ये मिळालं एवढं मोठं पद की ऐकून बसेल धक्का

थलपती विजय हे मुख्यमंत्री होणार असं भाकीत वर्तवणाऱ्या जोतिषाची चांगलीच लॉटरी लागल्याचं पहायला मिळत आहे. थलपती विजय मुख्यमंत्री होताच या ज्योतिषाला सरकारमध्ये अत्यंत मोठी जबादारी देण्यात आली आहे.

थलपती विजय यांच्यासंर्भातील भाकीत खरं ठरलं, अन् ज्योतिषाची लॉटरी, सरकारमध्ये मिळालं एवढं मोठं पद की ऐकून बसेल धक्का
Thalapathy Vijay
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 12, 2026 | 5:24 PM

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी मोठा उलटफेर पहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी अवघ्या तीन वर्ष आधी स्थापन झालेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं दणदणीत यश मिळवलं. थलपती विजय यांच्या नेतृत्वात टीव्हीकेनं एआयएडीएमके आणि सत्ताधारी असलेल्या डीएमकेला चांगलाच धोबीपछाड दिला. या दोन्ही पक्षांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालला. टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 108 जागा मिळाल्या. मात्र तरी देखील टीव्हीके बहुमतापासून दूर होती. थलपती विजय यांना सत्तास्थापन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. टीव्हीकेनं काँग्रेस आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षाच्या पाठिंब्यानं बहुमताचा आकडा गाठत शेवटी तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केली. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान थलपती विजय हे मुख्यमंत्री होणार असं भाकीत त्यांच्या ज्योतिषाने निवडणुकीपूर्वीच वर्तवलं होतं. हे भाकीत आता खरं ठरलं आहे. रिक्की राधान असं या ज्योतिषाचं नाव आहे. हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांचे हे ज्योतिषी आहेत. दरम्यान रिक्की राधान यांचं भविष्य खरं ठरल्यानं आता त्यांची लॉटरी लागली आहे. रिक्की राधान यांना सरकारमध्ये मोठं पद मिळालं आहे. थलपती विजय यांनी रिक्की राधान यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडीपदी केली आहे. रिक्की राधान यांच्या नियुक्तीचं पत्र देखील सरकारकडून जारी करण्यात आलं आहे.

कोण आहेत रिक्की राधान?

रिक्की राधान हे तामिळनाडूमधील प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. त्यांनी निवडणुकीपूर्वीच थलपती विजय हे मुख्यमंत्री होणार अशी भविष्यवाणी केली होती. एवढंच नाही तर तामिळनाडूमधील अनेक बडे नेते कोणत्याही महत्त्वाच्या कामापूर्वी रिक्की राधान यांचा सल्ला घेतात. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता या देखील रिक्की राधान यांना मोठा मान द्यायच्या, त्या आपल्या कोणत्याही राजकीय निर्णयापूर्वी रिक्की राधान यांचा सल्ला घेत असत. जेव्हा तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेला सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा सर्वात आधी रिक्की राधान हे थलपती विजय यांच्या घरी पोहोचले होते, त्यांचं थलपती विजय यांच्यासंदर्भात वर्तवलेलं भाकीत खरं ठरलं आहे.

 

Follow Us