‘प्रिय केळकर जी’ अभिवाचन कार्यक्रमातून उलगडले संघटन शिल्पी प्रा यशवंतराव केळकर यांचे व्यक्तिमत्त्व
Yashwantrao Kelkar : अभाविपचे संघटन शिल्पी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘प्रिय केळकर जी’ या विशेष अभिवाचन कार्यक्रमाचे करण्यात आले होते. यात केळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) दिल्लीतर्फे अभाविपचे संघटन शिल्पी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘प्रिय केळकर जी’ या विशेष अभिवाचन कार्यक्रमाचे भव्य आयोजन डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी सिविक सेंटर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री दत्तात्रेय होसबळे उपस्थित होते.
या प्रसंगी अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार भाटिया, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. रघुराज किशोर तिवारी, अखिल भारतीय छात्रा कार्य प्रमुख श्रीमती मनु शर्मा कटारिया, दिल्ली प्रदेशाध्यक्ष डॉ. तपन बिहारी आणि प्रदेशमंत्री श्री सार्थक शर्मा विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाला संघाचे वरिष्ठ प्रचारक, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष, दिल्ली सरकारचे मंत्री, संघ प्रेरित संघटनांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रनिष्ठ विचारवंत, संघटन शिल्पी आणि विद्यार्थी चेतनेचे प्रेरणास्थान असलेले प्रा. यशवंतराव केळकर यांचा जन्म 25 एप्रिल 1925 रोजी महाराष्ट्रातील पंढरपूर (सोलापूर) येथे झाला होता. विद्यार्थी जीवनापासूनच राष्ट्रकार्याला जीवनध्येय मानणाऱ्या केळकर यांनी 1945 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्य सुरू केले.
1955 मध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नॅशनल कॉलेजमध्ये अध्यापन सुरू केले आणि संघाच्या निर्देशानुसार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य उभारले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अभाविपला वैचारिक स्पष्टता, संघटनात्मक दृष्टी आणि कार्यकर्ता घडविण्याची प्रभावी पद्धत मिळाली, ज्यामुळे अभाविपला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी विद्यार्थी शक्तीला राष्ट्रनिर्मितीची शक्ती म्हणून उभे केले.
कार्यक्रमात पुण्याहून आलेल्या श्री मिलिंद भडगे यांच्या नेतृत्वाखालील अभिवाचन टोलीने ‘प्रिय केळकर जी’ या सादरीकरणातून प्रा. केळकर यांचे जीवन, विचार आणि कार्यपद्धती अत्यंत प्रभावीपणे मांडली. या सादरीकरणात अभाविपची कार्यशैली, पूर्वनियोजन, पूर्ण नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, शिस्त, सामूहिकता आणि कार्यकर्ता घडविण्याची जिवंत पद्धत दाखवण्यात आली, जी प्रा. केळकर यांनी आपल्या आयुष्यातून रुजवली होती.
कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले, “बाळासाहेब देवरस नेहमी म्हणायचे की, यशवंतराव केळकर हे डॉ. हेडगेवारांच्या परंपरेतील व्यक्तिमत्त्व आहेत. प्रा. केळकर यांनी संघटन उभारणीचे असे सूत्र दिले, ज्यावर अभाविपची भक्कम पायाभरणी झाली. त्यांनी अभाविपला केवळ आंदोलनापुरते मर्यादित न ठेवता रचनात्मकता, प्रतिनिधित्व आणि राष्ट्रनिर्मितीची दिशा दिली.”
ते पुढे म्हणाले, “प्रा. केळकर यांनी टीमवर्क, वेळेचे पालन, साधेपणा, संसाधनांचा योग्य वापर आणि आत्मीय कार्यपद्धतीद्वारे संघटन जीवनाचा आदर्श घालून दिला. ते कोणताही मत्सर किंवा द्वेष न बाळगता सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे जीवन कार्यकर्त्यांसाठी अखंड प्रेरणास्त्रोत आहे.” अभाविपच्या कार्यपद्धती आणि जीवनदृष्टीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, “प्रा. यशवंतराव केळकर यांच्यासोबत काम करताना मला विद्यार्थी परिषदेत जीवनदृष्टी मिळाली आणि संघात ती अधिक विकसित झाली.”
अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. रघुराज किशोर तिवारी म्हणाले, “प्रा. यशवंतराव केळकर यांचे जीवन प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्श आहे. आज देशभर दिसणारी अभाविपची कार्यपद्धती ही प्रा. केळकर यांनी दिलेली देणगी आहे. त्यांच्या जीवनातून हे शिकण्याची गरज आहे की कार्यकर्त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत कोणताही फरक नसावा.”
अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार भाटिया म्हणाले, “जर आपल्याला प्रा. केळकर यांचे व्यक्तिमत्त्व आणि अभाविपची कार्यपद्धती समजून घ्यायची असेल, तर त्यांच्या जीवन आणि विचारांवर आधारित साहित्याचा गंभीर अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रा. केळकर विद्यार्थी परिषदेला व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा मानत होते.”