
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्या दिवशी विचारपुष्प गुंफले. भारताला केंद्रस्थानी ठेवतच संघाची निर्मिती झाली आणि देशाला विश्वगुरू करण्यासाठी संघाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. संघ कार्याच्या प्रेरणा संघाच्या प्रार्थनेच्या अखेरीस भारत माता की जय या घोषणेतून मिळते. संघ वाढीची प्रक्रिया ही संथ आणि दीर्घ कालीन आहे. पण संघा मर्म हे वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर यावर आधारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गाव,समाज आणि राष्ट्र हा संघाचा आत्मा असल्याचे ते म्हणाले. संघाचे संपूर्ण कार्य हे स्वयंसेवकाआधारीत आहे. स्वयंसेवकच नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघाच्या प्रवासाची 100 वर्षे-नवीन क्षितीजे या विषयावर दिल्लीतील विज्ञान भवनात या तीन दिवसीय व्याख्यानमालेत डॉ. मोहनराव भागवत यांनी संघ, राष्ट्र, मानवता, संघ कार्य, संघाची वाटचाल यासह अनेक विषयावर सविस्तर मांडणी केली. त्यांनी संघाविषयीचे भ्रम, आरोप आणि इतर अनेक विषयांना हात घातला. या व्याख्यानमालेचा उद्देश त्यांनी कथित केला. समाजात संघाविषयी खरी आणि योग्य माहिती पोहचवण्याचा हा उद्देश असल्याचे ते म्हणाले. वर्ष 2018 मध्ये सुद्धा याच प्रकारचे आयोजन केल्याची आठवण त्यांनी सांगितली. यंदा व्याख्यानमालेचे बौद्धिक देशात चार ठिकाणी होत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा संघाचा हा पहिला प्रयत्न म्हणावा लागेल. सत्तेवर आधारीत राष्ट्राची व्याख्या होऊ शकत नाही. आपण पारतंत्र्यात होतो, तेव्हा पण हे राष्ट्र होतेच. इंग्रजीतील nation हा शब्द state या अर्थाने ध्वनीत होतो. पण भारतीय राष्ट्राची संकल्पना ही काही सत्तेशी जोडलेली नाही.
1857 च्या उठावाने प्रेरणा
1857 हा स्वातंत्र्य संग्रामातील पहिला उठाव होता. तो अपयशी ठरला. पण त्यामुळे प्रेरणा मिळाली. त्यानंतर आंदोलनं उभी ठाकली. मुठभर लोक आपल्याला कसं हरवू शकतात, हा विचारही पुढं आला. भारतीयांमध्ये राजकीय समज कमी असल्याचा दृष्टिकोनही समोर आला. त्यातूनच पुढे काँग्रेसचा उदय झाला. पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेस वैचारिक प्रबोधन करण्यात कमी पडली. हा काही आरोप नाही, तर एक तथ्य आहे. स्वातंत्र्यानंतर एका प्रवाहाने सामाजिक दुष्प्रवृत्तींचे उच्चाटन करण्यावर भर दिला. तर दुसऱ्या प्रवाहाने भारतीय मूळ प्रवाहाकडे वळण्याची हाक दिली. स्वामी विवेकानंद आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे विचार अग्रस्त केले. पुढे नेले, अशी मांडणी सरसंघचालकांनी केली.
समाजातील दुष्टप्रवृत्ती संपवण्यास प्राधान्य
डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि इतर महापुरुषांचे असे विचार होते की, समाजातील दुष्टप्रवृत्ती दूर केल्याशिवाय राष्ट्रोत्थानाचे प्रयत्न अपूर्ण आहे. वारंवार गुलामी स्वीकारणे हे त्याचेच संकेत होते. समाजात अत्यंत गंभीर दोष पैदा झाला आहे, हे त्या गुलामीचे प्रतीक होते. कुणाकडे समाजात बदलासाठी वेळ नसेल तर मी स्वतः त्यासाठी काम करेल याव डॉ. हेडगेवार हे ठाम होते. 1925 मध्ये त्यांनी संघाची स्थापना केली. त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाच्या संघटनेचे उद्दिष्ट्य समोर ठेवले.
हिंदू चा अर्थ काय?
त्यांनी यावेळी हिंदू नावाचे मर्म समजावून सांगितले. हिंदू शब्द हा केवळ धार्मिक नाही तर राष्ट्राविषयीच्या जबाबदारीचे भान आहे. हे नाव इतरांनी दिले आहे. माणूस, मानवता आणि सृष्टी हे एकमेकांना जोडलेले आहेत आणि एकमेकांवर ते परिणाम करतात अशी आमची धारणा आहे. हिंदू म्हणजे सर्व समावेशक आणि समावेशाला कोणत्याही सीमा नसतात अशी हिंदू शब्दाची संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. हिंदू म्हणजे तो जो यावर विश्वास ठेवतो. त्या मार्गावर चालतो. इतरांचे धर्मांतर करू नका. इतरांच्या श्रद्धेचा आदार करा. त्यांचा अपमान करू नका. ज्यांच्याकडे ही परंपरा आहे, ही संस्कृती आहे, तेच हिंदू आहेत. आपल्याला संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करावे लागेल. हिंदू विरुद्ध इतर सर्व असा त्याचा अर्थ होत नाही. हिंदूचा अर्थ सर्वसमावेशक असल्याचे सरसंघचालक म्हणाले.
भारत माता आणि आपल्या पूर्वजांना मानणाराच खरा हिंदू आहे. काही लोक स्वतःला हिंदू मानतात तर काही जण भारतीय सनातनी समजतात. शब्द बदलू शकतात. पण यामागे भक्ती आणि श्रद्धाची भावना एकच आहे. भारताची परंपरा आणि डीएनए सर्वांना जोडतो. विविधतेत एकता हीच भारताची ओळख आहे. हळूहळू आता सर्वच जण स्वतःला हिंदू म्हणू लागले आहेत. पूर्वी काही जण ही ओळख सांगत नव्हते, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.