
जगात कधी काय घडेल सांगता येत नाही. अज्ञान, अंधश्रद्धा आणि गैरसमजुतीमुळे लोक काय करतील याचा भरवसा नाही. हताशा आणि नैराश्यापोटी लोक अंधश्रद्धेच्या नादी लागतात आणि मग नको ते करून बसतात. त्यामुळे पश्चात्तापाशिवाय काहीच हाती लागत नाही. उत्तर प्रदेशातही अंधश्रद्धेतून एक भयानक घटना घडली आहे. सध्या राज्यात याच घटनेची चर्चा सुरू असून लोक ऐकून सुन्न झाले आहेत. काय घडलं असं उत्तर प्रदेशात?
उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी प्रचंड वेगाने वारे वाहू लागले होते. त्यामुळे कागदाचा तुकडा उडत उडत एका व्यक्तीच्या घरात येऊन पडला. त्यामुळे त्या व्यक्तीचं शेजाऱ्याशी कडाक्याचं भांडण झालं. या कागदाच्या तुकड्याच्या माध्यमातून टोटका करण्यात आला. करणी करण्यात आली आहे, असा दावा करत ही व्यक्ती शेजाऱ्यासोबत भांडत होती. हे भांडण एवढं पेटलं की लाठ्याकाठ्या घेऊन हाणामारी सुरू झाली. यात एकजण अत्यंत गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तिथे त्याचा मृत्यू झाला.
गाजीपूरच्या दिलदारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. या ठिकाणी राहणाऱ्या रामजी यादवच्या घरातून 2 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता कागदाचा एक तुकडा उडून शेजारच्या फेरू यादव याच्या घराच्या छतावर पडला. रामजी यादवने भूतप्रेत करून हा कागदाचा तुकडा आपल्या घरावर फेकल्याचा फेरू यादवच्या कुटुंबाला संशय आला. त्यानंतर शिवीगाळ सुरू झाली. शिवीगाळीवरून प्रकरण हाणामारीवर आलं. यावेळी महिलांनीही एकमेकींच्या झिंज्या पकडून एकमेकींना मारहाण केली.
लाठ्याकाठ्या घेऊन दोन्ही कुटुंब एकमेकांवर धावून गेले. यावेळी दोन्ही कुटुंबातील काही लोकांना जबर मारहाण झाली. या मारहाणीत जीतन यादव याला प्रचंड मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. जीतनला तात्काळ दिलदारनगरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला गाझीपूर मेडिकल कॉलेजात रेफर केलं. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून वाराणासीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केलं. वाराणासीत आल्यावर उपचार सुरू असतानाच जीतनने अखेरचा श्वास घेतला.
जीतन याचा मृत्यू झाल्यानंतर काल रात्री उशिरा त्याचा मृतदेह गावात आणण्यात आला. यावेळी मोठा गोंधळ झाला. लोकांनी गावात, रस्त्यावर सर्वत्र गर्दी केली होती. लोक जोरजोरात ओरडत होते. गोंधळ घालत होते. त्यामुळे पोलिसांनी रामजी यादव याच्या तक्रारीवरून चार लोकांच्या विरोधात 115(2), 352 आणि 351( 3) अंतर्गत गुन्हे दाकल केले आहेत. आता खूनाचं कलमही लावलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.