उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांचे महाराष्ट्राला वचन, ट्विट करत म्हणाल्या…
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी अजितदादांच्या विचारांचा वारसा जपण्याचे वचन देत भावूक ट्विट केले आहे. सविस्तर वाचा.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका ऐतिहासिक अध्यायाची सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर आता त्यांनी एक ट्वीट करत महाराष्ट्राला वचन दिले आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन, असे वचन सुनेत्रा पवार यांनी या ट्वीटद्वारे दिले आहे.
सुनेत्रा पवार ट्वीटमध्ये काय म्हणाल्या?
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन, असे ट्वीट सुनेत्रा पवार यांनी केले आहे.
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि… pic.twitter.com/5Tc2PsfDQ9
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 10, 2026
आगामी रणनीतीवर चर्चा
दरम्यान सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारण्यापूर्वी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे यांसारख्या प्रमुख नेत्यांसोबत प्राथमिक बैठक घेऊन आगामी रणनीतीवर चर्चा केली. पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार या आज त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या विकासकामांना गती देणे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावणे, हेच आपले मुख्य ध्येय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
