नियतीचा क्रूर खेळ, दोन जुळे भाऊ, जन्म एकत्र आणि मृत्यूही एकत्र; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील टांडा येथील काश्मिरीया गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अजय आणि विजय नावाचे जुळे भाऊ १४ जून रोजी शरयू नदीत बुडून मृत्युमुखी पडले. पाच तरुणांच्या अंघोळीच्यावेळी अचानक आलेल्या पूरप्रवाहामुळे हा अपघात घडला.

नियतीचा क्रूर खेळ, दोन जुळे भाऊ, जन्म एकत्र आणि मृत्यूही एकत्र; नेमकं काय घडलं?
Drowning
| Updated on: Jun 16, 2025 | 3:15 PM

एकाच वेळी जन्मलेल्या जुळ्या भावांचा मृत्यूही एकाच वेळी झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तरप्रदेशातील टांडा नगरमधील काश्मिरीया गावात घडली आहे. अजय आणि विजय असे मृत्यू झालेल्या दोन जुळ्या भावांचे नाव आहे. त्या दोघांचा १४ जूनला शरयू नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला. एकत्र जन्माला आलेल्या या दोन्ही भावांनी एकत्रच या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तरप्रदेशातील टांडा नगरमधील काश्मिरीया गावातील पाच तरुण अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यानंतर हे सर्वजण शरयू नदीच्या महादेव घाटावर अंघोळ करण्यासाठी उतरले. हे सर्वजण अंघोळ करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यानंतर पाण्यात निर्माण झालेल्या भोवऱ्यात हे सर्वजण ओढले गेले. यावेळी एका नावाड्याने दोन जणांना वाचवले. मात्र अभिषेक, अजय आणि विजय हे तिघे जण पाण्यात बुडाले.

पोलिसांनी अभिषेकचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. तर विजयचा मृतदेह रात्री उशिरापर्यंतच्या शोधमोहिमेनंतर मिळाला. एसडीआरएफच्या पथकाने शोधकार्य सुरू ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जून रोजी अजयचा मृतदेहही नदीतून बाहेर काढण्यात आला. या दोन्ही भावांच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबियांचे रडून-रडून हाल झाले. जेव्हा दोन्ही मृतदेह एकाच वेळी घरी आणले गेले, तेव्हा संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली.

एकाच दिवशी, एकाच ठिकाणी आणि एकाच अपघातात मृत्यू

दरम्यान अजय आणि विजय हे दोन्ही जुळे भाऊ स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. लहानपणापासून ते प्रत्येक गोष्ट एकत्रच करत होते. त्यांच्यात फार घट्ट नाते होते. ते एकमेकांशिवाय कधीच राहत नव्हते. कोण अजय आणि कोण विजय हे ओळखणेही लोकांसाठी कठीण होते. मात्र, नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच ठरवले होते. जन्माप्रमाणेच त्यांचा मृत्यूही एकाच दिवशी, एकाच ठिकाणी आणि एकाच अपघातात झाला. त्यामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे.