Yamuna Expressway Bus Fire : यमुना एक्सप्रेस वे वर धावती AC बस पेटली, 9 प्रवासी जिवंत जळाले

Yamuna Expressway Bus Fire : "मी झोपलेलो, त्याचवेळी कोणीतरी दरवाजा ठोठावला. डोळे उघडले तेव्हा चारही बाजूला धूरच होता. आरडाओरडा, पळापळ सुरु होती. मी माझं सामान, बूट काही उचललं नाही"

Yamuna Expressway Bus Fire : यमुना एक्सप्रेस वे वर धावती AC बस पेटली, 9 प्रवासी जिवंत जळाले
Yamuna Expressway Bus Fire
| Updated on: Sep 24, 2026 | 7:59 AM

दिल्ली-NCR ला लागून असलेल्या ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवर एक दुर्देवी घटना घडली आहे. नोएडा येथून महोबाला चाललेल्या एका खासगी डबल डेकर स्लीपर AC बसने अचानक पेट घेतला. या बसमध्ये 35 प्रवासी होते. या भयानक दुर्घटनेत 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. काही प्रवासी जिवंत जळाले तर काहींचा श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाला. ग्रेटर नोएडा येथून बस आग्र्याच्या दिशेने जात असताना यमुना एक्सप्रेस वे वरील दयानतपुर गावाजवळ ही दुर्घटना घडली. ही प्रायवेट डबल डेकर बस दयानतपूर गावाजवळ पोहोचताच अचानक बसमधून धूर येऊ लागला. बसला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. चालकाने प्रसंगावधान दाखवत लगेच बस एक्सप्रेस वे च्या कडेला उभी केली. लगेच संपूर्ण बसने पेट घेतला. पाहता-पाहता बस आगीचा गोळा बनली. आतमधल्या प्रवाशांना काही समजण्याआधीच संपूर्ण बसला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. बसच्या आतून ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येत होते.

या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेल्या प्रवाशाने त्याला आलेला भयानक अनुभव सांगितला. “मी झोपलेलो, त्याचवेळी कोणीतरी दरवाजा ठोठावला. डोळे उघडले तेव्हा चारही बाजूला धूरच होता. आरडाओरडा, पळापळ सुरु होती. मी माझं सामान, बूट काही उचललं नाही. फक्त फोन हातात घेतला आणि बाहेरच्या बाजूला पळालो. बसमध्ये इतका धूर होता की, आतमध्ये काही दिसत नव्हतं. श्वास कोंडला गेल्यामुळे लोक आत तडफडत होते. मागे काही लोक अडकलेले ते बाहेर निघू शकले नाहीत”

आगीचं कारण काय?

दुर्घटनेची माहिती मिळताच यमुना एक्सप्रेस वे चे खासगी सुरक्षारक्षक, फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि बचाव पथकाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं. होरपळलेल्या प्रवाशांना लगेच नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. प्रारंभिक चौकशीत शॉर्ट सर्किटला आगीचं कारण मानलं जातय. पोलीस अपघाताची सखोल चौकशी करत आहे.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेची माहिती घेतली. सीएम योगींनी जिवीतहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. ज्यांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलय त्यांच्या कुटुंबियांबद्दल दु:ख व्यक्त केलं. सीएम योगींनी अपघातातील जखमींना चांगल्यात चांगले उपचार देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us