Skin Care Science: पुरुषांनी महिलांचे क्रीम किंवा सीरम लावावे का? काय सांगतं विज्ञान? जाणून घ्या स्किन केअरमागचं विज्ञान…
Are Women Creams and Serums Safe for Men: पुरुष स्त्रियांची क्रीम किंवा सीरम वापरू शकतात का? त्यांची त्वचा इतकी वेगळी असते का की त्यांची सौंदर्य उत्पादनेही वेगळी असावीत?

बाजारात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी या नावाखाली वेगवेगळ्या क्रीम्स आणि फेस वॉश विकले जातात. प्रश्न असा आहे की, दोघांच्या त्वचेचे प्रकार इतके वेगळे आहेत का की त्यांची सौंदर्य उत्पादनेही वेगळी असावीत? पुरुषांनी महिलांची सौंदर्य उत्पादने वापरावीत का? यावर विज्ञान काय म्हणते? संशोधनातून असे दिसून आले आहे की दोन्ही उत्पादनांमध्ये फरक आहेत. परंतु त्यातील बहुतेक फरक हार्मोन्सशी संबंधित आहेत.
पुरुषांची त्वचा सरासरी २०% अधिक जाड असते आणि त्यात कोलेजनचे प्रमाण जास्त असते. टेस्टोस्टेरॉनमुळे पुरुषांच्या त्वचेत सेबम जास्त प्रमाणात तयार होते आणि त्वचेची छिद्रे मोठी असतात. यामुळे पुरुषांना तेलकट त्वचा आणि मुरुमांचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, पुरुषांच्या त्वचेचा pH ५ पेक्षा कमी असतो, तर महिलांच्या त्वचेचा pH ५ पेक्षा जास्त असतो. यामुळेच महिलांची त्वचा अनेकदा कोरडी असते आणि तिला जास्त मॉइश्चरायझरची गरज असते. वयानुसार त्वचेतही बदल होतात.
‘टाइप ब्यूटी’च्या संस्थापक अनन्या कपूर म्हणतात, उत्पादन निर्मितीच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, मेकअप उत्पादने मुळातच लिंग-विशिष्ट नसतात. फाउंडेशन, कन्सीलर आणि लिप प्रोडक्ट्ससारखी उत्पादने लिंगाचा विचार न करता, पिगमेंटची घनता, शेड, टेक्स्चर, पसरण्याची क्षमता आणि फिनिश यांसारख्या घटकांचा विचार करून तयार केली जातात. हार्मोनल फरकांमुळे सेबमचे उत्पादन, चेहऱ्यावरील केस आणि त्वचेचा पोत यांसारख्या वैशिष्ट्यांवर परिणाम होऊ शकतो, परंतु एखादी व्यक्ती विशिष्ट मेकअप उत्पादन वापरू शकते की नाही हे या घटकांवरून ठरत नाही.
उत्पादनाची रचना, व्यक्तीच्या त्वचेशी त्याची सुसंगतता आणि त्याचे सौंदर्यविषयक परिणाम हे महत्त्वाचे घटक आहेत. उत्पादनाची परिणामकारकता ते कोणत्या लिंग गटासाठी विकले जाते यावर अवलंबून नसते, तर त्याचे गुणधर्म वापरकर्त्याच्या गरजांशी किती जुळतात यावर अवलंबून असते. तुमची त्वचा बाटलीवरचं लेबल वाचत नाही,” असं सेरेकोच्या संस्थापक मालविका जैन म्हणतात. मुरुमं, कोरडेपणा, संवेदनशीलता आणि अकाली वृद्धत्व या समस्या पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही सारख्याच प्रमाणात दिसू शकतात.
फरक फक्त हार्मोन्स, तणाव, झोप, जीवनशैली किंवा व्यक्ती राहत असलेल्या वातावरणासारख्या कारणांमध्ये असतो. मनोत्वचाविज्ञानाच्या दृष्टिकोनातून, हे आणखी महत्त्वाचे ठरते, कारण आपल्याला जे वाटते ते अनेकदा आपल्या त्वचेवर प्रतिबिंबित होते. म्हणून एखादे उत्पादन पुरुषांसाठी आहे की स्त्रियांसाठी आहे, हे विचारण्याऐवजी, तुमच्या त्वचेला खरोखर कशाची गरज आहे. कोणते घटक ती गरज पूर्ण करू शकतात, हे विचारा. त्वचेची काळजी तेव्हाच सर्वोत्तम काम करते, जेव्हा ती लिंगानुसार नव्हे, तर व्यक्तीच्या गरजेनुसार तयार केली जाते.
एखादे सौंदर्य किंवा त्वचेची काळजी घेणारे उत्पादन एखाद्या व्यक्तीसाठी योग्य आहे की नाही, हे ते पुरुषांसाठी आहे की महिलांसाठी, यापेक्षा त्या उत्पादनाच्या रचनेवर आणि त्या व्यक्तीच्या गरजांवर अधिक अवलंबून असते. मेकअपमध्ये, त्वचेचा रंग, त्वचेचा प्रकार, रंगद्रव्यांचे वितरण, पोत, कव्हरेज आणि अपेक्षित फिनिश यांसारखे घटक उत्पादन कसे काम करेल हे ठरवतात. उदाहरणार्थ, एकच कन्सीलर पुरुष आणि स्त्रिया दोघेही वापरू शकतात.
निवड त्वचेच्या रंगावर, त्वचा कोरडी आहे की तेलकट, आणि तुम्हाला किती कव्हरेज हवे आहे यावर अवलंबून असेल. बऱ्याचदा, फरक उत्पादन कसे लावले जाते आणि अपेक्षित परिणामावर अवलंबून असतो. चीन, दक्षिण कोरिया आणि थायलंडसारख्या आशियाई सौंदर्य बाजारपेठांमध्येही हा बदल दिसून येत आहे. सर्व लिंगांसाठी मेकअप आणि त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांचा प्रचार केला जात आहे. सौंदर्य मोहिमांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही मॉडेल्सचा समावेश आहे. चीनमधील उदयास येत असलेला ‘अँटी-ब्लश’ ट्रेंड हे याचे आणखी एक उदाहरण आहे.
यामध्ये पारंपरिक गुलाबी रंगांऐवजी हलक्या आणि नैसर्गिक छटा असलेल्या ब्लश शेड्सची निवड केली जात आहे, जे दर्शवते की लोकांच्या मेकअपच्या आवडीनिवडी आता पारंपरिक लिंग-आधारित रूढींच्या पलीकडे जात आहेत. भारतात पुरुषांची मेकअप, त्वचेची काळजी आणि ग्रूमिंगमध्ये आवड वाढत आहे, त्यामुळे येथेही ग्राहकांच्या वर्तनात असेच बदल दिसण्याची शक्यता आहे. ‘प्रूश ब्यूटी’चे सह-संस्थापक गरिमा जुनेजा आणि गौरव मिश्रा म्हणतात, “उत्पादनाची निवड लिंगाच्या आधारावर न करता, ते तुमच्या त्वचेला अनुकूल आहे की नाही, त्यातील घटक, त्याची रचना आणि तुम्हाला अपेक्षित असलेले परिणाम यावर आधारित असावी.”
अॅनालॉजी ब्यूटीचे संस्थापक, गौरीश सचदेवा म्हणतात, पारंपारिकपणे, त्वचेची काळजी पुरुष आणि महिलांसाठी विभागली गेली आहे. अनेकदा, ही विभागणी त्वचेच्या वैयक्तिक गरजांऐवजी सुगंध, पोत आणि पॅकेजिंगमधील फरकांवर आधारित असते. वास्तविक पाहता, एखादे उत्पादन कसे तयार केले आहे आणि ते व्यक्तीच्या त्वचेच्या समस्या किंवा गरजांना किती चांगल्या प्रकारे जुळते, यावर त्वचा प्रतिसाद देते. उदाहरणार्थ, कोरियन स्किनकेअरमध्ये अवलंबलेल्या बहु-स्तरीय पद्धतीमध्ये, उत्पादनांच्या उद्देशानुसार त्यांचे थर लावले जातात. यामुळे लोकांना त्यांच्या त्वचेच्या गरजेनुसार त्यांची दिनचर्या तयार करता येते.
जर एखाद्या पुरुषाची त्वचा कोरडी किंवा संवेदनशील असेल, तर त्याच हायड्रेटिंग उत्पादनांचा त्याला फायदा होऊ शकतो, जी त्याच प्रकारच्या समस्या असलेल्या महिलेसाठी उपयुक्त ठरतात. त्वचेची काळजी केवळ ‘गरजांवर’ आधारित असण्याकडे बदल व्हायला हवा. लिंग-आधारित वर्गीकरणापेक्षा स्वतःच्या त्वचेला समजून घेणे अधिक महत्त्वाचे असले पाहिजे.”
