Weather Update : IMD कडून पुन्हा पावसाचा मोठा इशारा, 13 राज्यांमध्ये धो-धो कोसळणार, महाराष्ट्रात काय स्थिती?
भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तेरा राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. वातावरणात अचानक मोठा बदल पहायला मिळत असून, या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) महाराष्ट्रासह देशाचा नवा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या नव्या हवामान अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये तेरा राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतामधील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राजांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर केंद्रशासित प्रदेशांपैकी लक्षद्वीप, आणि अंदान-निकोबारमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान या काळात तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीप या भागांमध्ये पावसासोबतच वादळाचा देखील इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, याकाळात वाऱ्याचा वेग प्रति तास 40 ते 50 किमी इतका राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
यंदा भारतात मान्सूवर एल निनोचं सावट पाहायला मिळालं, जुलै महिना वगळता इतर कोणत्याही महिन्यात पुरेसा पाऊसच झाला नाही. आता तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता मावळली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस राज्यात आकाश निरभ्र राहणार असून, हळुहळु राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह गोव्यात देखील थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
पावसावर ऐल निनोचं संकट
दरम्यान यंदा पावसावर ऐल निनोचं मोठं संकट होतं, ऐल निनोमुळे पावसात मोठा खंड पडला. पाऊसच न पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे. अन्नधान्याची तर टंचाई आहेच, सोबतच जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील बिकट बनला आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर वाढलं आहे.
