लग्झरी गाडी असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये जेवणात कीडे, यापूर्वी निघाले होते झुरळ

Vande Bharat Express: भोपाळ ते हजरत निजामुद्दीन जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात कीडे सापडले. झाशी रेल्वे स्टेशनवर सकाळी 8 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस पोहचताच प्रवाशांना नास्ता देण्यात आला. त्यावेळी अभयसिंह सेंगर यांच्या नास्त्याच्या पॅकेजमध्ये कीडे सापडले.

लग्झरी गाडी असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये जेवणात कीडे, यापूर्वी निघाले होते झुरळ
वंदे भारत एक्स्प्रेसमधील फूडमध्ये आळ्या
| Updated on: Aug 19, 2024 | 10:04 AM

देशात वंदे भारत एक्स्प्रेस सर्वात लोकप्रिय रेल्वे ठरली आहे. सेमी हायस्पीड असलेल्या या रेल्वेत अनेक सुविधा दिल्या आहे. लग्झरी सुविधांमुळे विमानपेक्षा वंदे भारतमधून प्रवास करण्याकडे लोकांचा कल आहे. या रेल्वेत प्रवाशांना चांगल्या दर्जाचा नास्ता आणि जेवण दिले जात असल्याचा दावा केला जातो. परंतु प्रत्यक्षात वेगळाच प्रकार समोर आला. वंदे भारत एक्स्प्रेसमधील जेवणात झुरळ निघाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. आता कीडे निघाले आहे.

रेल्वेच्या खाद्यपदार्थांमध्ये घाण असण्याच्या घटना नियमित घडत असतात. परंतु या घटना वंदे भारतसारख्या लग्झरी ट्रेनमध्येही वाढत आहेत. आता भोपाळ ते हजरत निजामुद्दीन जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात कीडे सापडले. झाशी रेल्वे स्टेशनवर सकाळी 8 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस पोहचताच प्रवाशांना नास्ता देण्यात आला. त्यावेळी अभयसिंह सेंगर यांच्या नास्त्याच्या पॅकेजमध्ये कीडे सापडले. त्याची तक्रार त्यांनी टीटीई आणि रेल्वे कॅटरिंग अधिकाऱ्याकडे केली. तसेच त्याचा व्हिडिओसुद्धा तयार केला.

दुसरे पॅकेटही दिले नाही

अभयसिंह सेंगर यांनी सांगितले की, वंदे भारत एक्स्प्रेसच्या फूड पॅकेटमदध्ये कीडे निघाल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतरही आपणास पॅकेट बदलून दिले नाही. 9:40 वाजता मी ग्वालियरमध्ये उतरून गेलो. या घटनेसंदर्भात बोलताना आयआरसीसीटीचे रिजनल मॅनेजर आर भट्टाचार्य यांनी म्हटले की, संबंधित प्रवाशाला दुसरे पॅकेट देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. तसेच वेंडरवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये यापूर्वी घडल्या घटना

  • 1 फेब्रुवारी 2024 रोजी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या जेवणात झुरळ निघाले होते.
  • 24 जुलै 2024 रोजी एका प्रवाशाच्या चपातीमध्ये झुरळ निघाले. त्याचा फोटो त्याने ट्विट केला होता.

वंदे भारत सारख्या रेल्वेत जेवणात कीडे, झुरळ निघाल्याचे प्रकार वाढत आहेत. परंतु त्याची दखल रेल्वे मंत्रालय किंवा रेल्वेचे अधिकारी घेत नाही. देशात नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याची तयारी केली जात असताना असे प्रकार समोर येत आहे.