Murshidabad Violence : पोलिसांना मशिदीत शरण घेण्याची वेळ, तुफान दगडफेक, जाळपोळ, वक्फ कायद्यावरुन मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार
Murshidabad Violence : वक्फ कायद्याविरोधात आंदोलन करताना जमाव हिंसक झाला. मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. राज्यपाल सीवी आनंद बोस यांनी राज्य सरकारला संवेदनशील क्षेत्रात कायदा हातात घेण्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर तत्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यास सांगितलं आहे.

पश्चिम बंगालच्या अनेक भागात शुक्रवारी वक्फ कायद्याविरोधात आंदोलनं झाली. या आंदोलनाला हिंसाचाराच गालबोट लागलं. आंदोलकांनी यावेळी जाळपोळ केली. वाहनं पेटवली. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीत अडथळे आणले. जमावाला नियंत्रित करताना जवळपास 10 पोलीस जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी या हिंसाचारावरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला. बंगाल पोलिसांनी X वर पोस्ट करुन माहिती दिली की, जंगीपूरच्या सुती आणि समसेरगंज येथे स्थिती आता नियंत्रणात आहे. पोलिसांनी जोरदार प्रहार करत अनियंत्रित जमावाला पांगवलं. नॅशनल हाय वे वर वाहतूक आता सुरळीत आहे.
हिंसा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. समाजकंटकांच्या अटकेसाठी छापेमारीची कारवाई सुरु आहे. चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. अफवांवर लक्ष देऊ नका आणि शांतता राखा असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.
वक्फ कायद्याविरोधात प्रदर्शन
मुर्शिदाबाद जिल्ह्यात सुती येथे जुम्याची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम समुदायाचे लोक एकत्र झाले आणि वक्फ कायद्याविरोधात प्रदर्शन करतान जमाव हिंसक बनला असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. शमशेरगंज येथे डाकबंगला ते सुतिर सजुर मोडपर्यंत आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग-12 चा एक भाग बंद केला. आंदोलकांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. पोलीस व्हॅन आणि सार्वजनिक वाहनं पेटवली.
10 पोलिसवाले जखमी
आंदोलकांनी पोलीस व्हॅनवर दगडफेक केली. त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली. यात 10 पोलिसवाले जखमी झाले. काही आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला, असं अधिकाऱ्याने सांगितलं. त्यानंतर पोलिसांना अनियंत्रित जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
The situation in the Suti and Samserganj areas of Jangipur is now under control. The unruly mob has been dispersed by effective police action. Traffic has returned to normalcy on the national highway. Strict action will be taken against those who have resorted to violence. Raids… pic.twitter.com/dLFahE5QlI
— ANI (@ANI) April 11, 2025
मशिदीत शरण घ्यावी लागली
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हिंसाचार सुरु असताना काही पोलिसवाल्यांना जवळच्या मशिदीत शरण घ्यावी लागली. जिल्हा प्रशासनाने परिस्थिती सामान्य करण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला (BSF) हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मालदा येथे आंदोलकांनी रेल्वे रुळावर धरणं आंदोलन केलं. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
