Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्यासमोर आज अस्तित्वाचं आव्हान, अशी वेळ का आली?

Mamata Banerjee : ममता बॅनर्जीं एकट्या डाव्यांविरोधात वाघिणीसारख्या लढल्या. त्यांच्यावर हल्ले सुद्धा झाले. पण त्या डगमगल्या नाहीत. हार मानली नाही, डाव्यांसमोर ताठ कण्याने उभ्या राहिल्या. पण आज त्याचं ममता बॅनर्जींसमोर राजकीय अस्तित्वाचं आव्हान निर्माण झालं आहे.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्यासमोर आज अस्तित्वाचं आव्हान, अशी वेळ का आली?
Mamata Banerjee
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2026 | 3:20 PM

निडर, बेधडक, बिनधास्त, समोर कितीही मोठी शक्ती असली तरी झुकायचं नाही, न्यायासाठी लढायचं, भिडायचं असा विचार, प्रवृत्ती म्हणजे ममता बॅनर्जी. या गुणांमुळेच ममता बॅनर्जी इतर नेत्यांपेक्षा वेगळ्या ठरतात. ममता बॅनर्जींसारखा झुंजार बाणा ठेवणारे नेते आज देशाच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच उरले असतील. ममता बॅनर्जी म्हणजे वन मॅन आर्मी. काँग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. पण राष्ट्रीय पक्षात काम करताना त्यांना काही मर्यादा जाणवल्या, मतभेद झाले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेसच्या रुपाने स्वत:चा पक्ष स्थापन केला. पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमुल काँग्रेसने राज्याची सत्ता मिळवण्यापर्यंत मजल मारली, त्याचं सर्व श्रेय ममता बॅनर्जी यांनाच जातं. सिंगूर जमीन अधिग्रहणाच्या वेळी ममता बॅनर्जी यांच्या उपोषणाने पश्चिम बंगालचं राजकारण बदललं. डाव्यांचा अस्त आणि तृणमुलचा उदय झाला. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना सत्तेवरुन हटवणं अजिबात सोपं नव्हतं. 30 वर्षापेक्षा अधिक काळ पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या हातात सत्ता होती. डाव्यांना विरोध करणं सोपं नव्हतं. पश्चिम बंगालच्या राजकारणावर, समाजकारणावर डाव्यांची घट्ट पकड होती.

पण ममता बॅनर्जीं एकट्या डाव्यांविरोधात वाघिणीसारख्या लढल्या. त्यांच्यावर हल्ले सुद्धा झाले. पण त्या डगमगल्या नाहीत. हार मानली नाही, डाव्यांसमोर ताठ कण्याने उभ्या राहिल्या. 2011 साली ममता बॅनर्जी यांचं सरकार पहिल्यांदा सत्तेवर आलं. सलग 15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर 4 मे 2026 रोजी तृणमुलचा सत्तेचा सूर्य मावळला. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपचं सरकार सत्तेवर आलं. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला नाही. 1998 नतंर 2011 पर्यंत अनेक विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण मागच्या महिन्यात पराभव झाल्यानंतर तृणमुल काँग्रेसची जी हालत झालीय, तिथ स्थिती याआधी कधी झाली नव्हती. अवघ्या एका महिन्यात नव्याने निवडून आलेले तृणमुल काँग्रेसचे आमदार, खासदार फुटले आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे. अशी वेळ का आली? याचा विचार होणं सुद्धा गरजेच आहे.

आज अस्तित्व टिकवण्याचं आव्हान

दीड महिन्यापूर्वी ममता बॅनर्जी तृणमुल काँग्रेसच्या बलाढ्य नेत्या होत्या. त्यांनी कोणी आवाहन देऊ शकत नव्हतं. पण भाजपकडून झालेल्या दारुण पराभवानंतर सर्व चित्रच पालटून गेलय. स्वत: ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 215 जागा जिंकणाऱ्या तृणमुलला अवघ्या 80 जागांवर समाधान मानावं लागलं. 1998 साली स्थापन झालेल्या तृणमुल काँग्रेसचं अस्तित्व टिकवण्याचं आज ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभं राहिलं आहे.

अनेक आमदारांच्या स्वाक्षऱ्या संशयास्पद

सभागृहात विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीवरुन तृणमुलमध्ये या सर्व बंडखोरीची सुरुवात झाली. पश्चिम बंगाल विधानसभेत ममता बॅनर्जी यांच्याकडून शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. पण ही निवड करताना काही आमदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा आरोप झाला. अनेक आमदारांच्या स्वाक्षऱ्या संशयास्पद होत्या. आमदार बैठकीला उपस्थित नसताना त्यांची नावं होती. म्हणूनच विधानसभा सचिवालयाने पोलिसात तक्रार दाखल केली. तृणमुलच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांना 58 आमदारांच्या सह्याचं एक पत्र दिलं. त्यात पक्षातून काढण्यात आलेल्या ऋतब्रत बॅनर्जी हेच विधिमंडळ पक्षाचे नेते असल्याचं सांगण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच तृणमुल काँग्रेसने ऋतब्रत बॅनर्जी आणि आमदार संदीपन साहा यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करुन त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं. त्यांच्यावर संघटनेला कमकुवत केल्याचा आरोप झाला.

तृणमुल मधल्या वादाचं कारण काय?

सध्या तृणमुल काँग्रेसमध्ये जो अंतर्गत कलह सुरु आहे, त्याला कारण अभिषेक बॅनर्जी असल्याचं बोललं जातं. ममता बॅनर्जी यांचा उत्तराधिकारी कोण? हे या लढाईमागचं कारण आहे. अभिषेक बॅनर्जी ममता बॅनर्जी यांचा भाचा आहे. त्यामुळे पक्षात त्याच्या शब्दाला वजन होतं. पण अन्य नेते वारसदार म्हणून अभिषेकला स्वीकारायला तयार नाहीत हेच दिसून आलय. संदीपन साहा यांनी जाहीरपणे पक्षाच्या सध्याच्या स्थितीसाठी अभिषेक बॅनर्जीला जबाबदार धरलं. “गोष्टी योग्य घडल्या, तर श्रेय घेतलं जातं. त्यामुळे परिस्थिती खराब असेल तर त्याची सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे” असं संदीपन साहा अभिषेक बॅनर्जी बाबत म्हणाले.

लोक मला पाहून चोर-चोर तरी म्हणत नाहीत

राजकीय विश्लेषकांनुसार हा वाद तृणमुल काँग्रेसच्या उत्तराधिकारीच्या लढाईचे संकेत आहेत. मागच्या काही वर्षात अभिषेक बॅनर्जी पक्षातील प्रभावी नेता म्हणून पुढे आले आहेत. निवडणूक रणनिती, संघटना आणि प्रचार या तिघांच्या केंद्रस्थानी ते असतात. ममता बॅनर्जी यांच्यानंतर त्यांच्याकडेच पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातं. पण अभिषेक वाढता प्रभाव पक्षाच्या काही नेत्यांना खटकतो. निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घेत नाही, अशी त्यांची तक्रार असते. ऋतब्रत बॅनर्जी यांनी याआधी सुद्धा पक्षाचे सल्लागार आणि रणनितीकारांच्या वाढत्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं. त्यांचा इशारा अभिषेकच्या टीमकडे होता. लोक मला पाहून चोर-चोर तरी म्हणत नाहीत असं म्हणून त्यांन अभिषेक बॅनर्जी यांना टोमणा मारलेला.

ममता बॅनर्जींना थेट का टार्गेट करत नाहीत?

ममता बॅनर्जी यांचं जनमानसातलं स्थान बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना ठाऊक आहे. म्हणून हे नेते थेट ममता बॅनर्जींना टार्गेट करत नाहीयत. ते त्यांच्या भाच्याला अप्रत्यक्षपणे जबाबदार ठरवून आपणच तृणमुल काँग्रेसच्या विचारांचे रक्षक आहोत, हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही, तर दिल्लीतही ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी काल दिल्लीत होत्या. त्यावेळी पक्षाच्या 28 खासदारांपैकी 20 खासदारांनी विरोधात जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यांना भाजपप्रणीत NDA चा भाग बनायचं आहे.

घराणेशाहीवर चालणाऱ्या बहुतांश पक्षांसमोर आज हीच आव्हानं

तृणमुल काँग्रेसमध्ये जे चाललय त्यासाठी भाजपला अजिबात जबाबदार धरता येणार नाही. एवढे सगळे आमदार, खासदार एकाचवेळी विरोधात जात असतील, तर पक्षातंर्गत किती खदखद, असंतोष आहे ते स्पष्ट होतं. सत्ता होती म्हणून इतकीवर्ष हे सर्व शांत होतं. एका नेत्याच्या बळावर चालणाऱ्या पक्षाची अशी अवस्था हे देशासाठी अजिबात नवीन नाही. भाजपने राष्ट्रीय राजकारणात जी कमाल करुन दाखवलीय, त्यामुळे घराणेशाहीवर चालणाऱ्या बहुतांश पक्षांसमोर आज हीच आव्हानं आहेत.

Follow Us