पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेची पुनरावृत्ती? जे उद्धव ठाकरे आमदारांना म्हणाले तेच ममता दीदी म्हणाल्या, पक्षात मोठा भूकंप होणार?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर टीएमसीमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. ममता बॅनर्जींनी 'ज्यांना जायचंय त्यांनी जावं' असं ठामपणे सांगून पक्षांतर्गत बदलाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या बंडासारखीच परिस्थिती बंगालमध्ये निर्माण होते की काय, अशी चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ममता आता पक्ष पुनर्बांधणीसाठी सज्ज आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे सत्ता गमावल्यानंतर आणि अनेक वर्षांनी मोठा झटका सहन कराव्या लागलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सुप्रीमो ममता बॅनर्जी या सध्या संघटना पुन्हा नव्या जोमाने उभी करण्याच्या प्रयत्नात आबेत. कोलकात्यामधील कालीघाट येथील निवासस्थानी ममता बॅनर्जी यांनी (विधानसभा) निवडणूक लढवलेल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांसोबत एक महत्वापूर्ण समीक्षा बैठक घेतली. या बैठीकासीठ पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी हे देखील उपस्थित होते. पराभवानंतर पक्षांतर्गत निर्माण झालेला कलह आणि नेत्यांच्या पक्ष बदलण्याच्या अनेक अटकळींच्या पार्श्वभूमीवर, ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्यांना पक्ष सोडायाच आहे, ते तसं करण्यास मुखत्यार असल्याचं त्या म्हणाल्या. मात्र त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ माजली आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राप्रमाणे ( शिवसैनिकांचा गुवाहाटी दौरा आणि झालेलं बंड) परिस्थिती उद्भवते, तशीच पुनरावृत्ती होते की काय असा प्रश्न आता अनेकांच्या मनात उद्भवला आहे.
ज्यांना जायचंय त्यांनी जावं, मी जबरदस्ती थांबवणार नाही
पक्षातील सूत्रांनुी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत नेत्यांच्या पक्षबदलाच्या वृत्तांवर स्पष्टपणे भाष्य केले. त्या म्हणाल्या, ” जे (लोक) दुसऱ्या पक्षांमध्ये जात आहेत, त्यांना जाऊ द्या. मी पक्षाची पुनर्बांधणी करेन. जे माझ्यासोबत आहेत, त्यांना मी आवाहन करते की त्यांनी पक्षाची नुकसान झालेली कार्यालये दुरुस्त करावीत, त्यांची डागडुजी करा, रंगरंगोटी करा आणि ती पुन्हा सुरू करावीत. गरज पडल्यास, मी स्वतः त्या कार्यालयांना रंग देईन. तृणमूल काँग्रेस कधीही झुकणार नाही.” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“मला माहीत आहे की बरेच लोक दुसऱ्या पक्षात जातील. त्यांची स्वतःची काही कारणं असू शकतात. त्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. ज्याला जायचंय ते जाऊ शकतात, कोणालाही जबरदस्तीने रोखण्यावर माझा विश्वास नाही.” असंही ममता बॅनर्जींनी पुढे म्हटलं.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी, 5 मे रोजी, ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच पुनरुच्चार केला होता की, पक्षात कोणालाही जबरदस्तीने ठेवण्यावर त्यांचा विश्वास नाही. शनिवारच्या बैठकीनंतर, टीएमसीच्या ‘एक्स’ (X) या अधिकृत सोशल मीडिया हँडलने नेत्यांचे फोटो शेअर केले. “आज, आमच्या माननीय अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी कालीघाट येथे आमच्या उमेदवारांची भेट घेतली. या नेत्यांनी अकल्पनीय अत्याचार आणि सततच्या धमक्यांना न जुमानता अतुलनीय धैर्याने निवडणुका लढवल्या. तृणमूल काँग्रेस एका कुटुंबाप्रमाणे एकजूट आहे. ज्यांनी जनतेचा कौल चोरला आहे, त्यांच्यापुढे आम्ही कधीही झुकणार नाही. अखेरीस सत्याचाच विजय होईल” असं त्यात नमूद करण्यात आलं होतं.
महाराष्ट्राची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये ?
साधारण 4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि काही समर्थक आमदारांनी बंड पुकारलं. 22 जून 2022 विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्याआधी दोन दिवसांपूर्वी राज्यसभेची निवडणूक पार पडली होती. पुरेसे संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीचा राज्यसभेत एक आणि विधान परिषदेत एक उमेदवार पराभूत झाला. निवडणूक म्हणून त्याला गांभीर्य आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली. फोन सुरु झाले पण काही आमदार ‘नॉट रिचेबल’ होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काही समर्थक आमदारांसोबत सुरतला निघाले होते. सुरतमधील ली मेरिडियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सर्व असल्याचे उघड झालं.
त्यानंतर शिवसेनेतील काही नेते, आमदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत आमदारांना रोखण्याचे आवाहन केले होते. मात्र तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तसे करण्यास नकार दिला होता, ज्यांना जायचं त्यांनी जावं, मी पक्ष सांभाळून घेण्यास समर्थ असल्याचं ते म्हणाले होते. मात्र त्यांचा हाच अतिआत्मविश्वास त्यांना नडला आणि शिवसेनेची दोन शकलं झाली. पक्षाची झालेली ही हानी, शिवेसेनेतील बंड, एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेवर केलेला दाव हाँ उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच काहीसं विधान केलं असून ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचंय त्यांनी जाव असं म्हटलं आह.त्यामुळे बंगालमध्येही महाराष्ट्राची पुनरावृत्ती होते की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
जनादेश धुडकावला
नुकत्याच पार पडलेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्णपणे कोसळला. पक्षाला अभूतवपूर्व पराभवाचा सामान करावा लागला आणि टीएमसीला सत्तेतून आता विरोधी बाकांवर ढकलण्यात आले आहे. राज्याच्या 294 विधानसभा जागांपैकी टीएमसीला केवळ 80 जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत पक्षाने 291 जागांवर उमेदवार उभे केले, तर आपला मित्रपक्ष असलेल्या बीजीपीएमला तीन जागा दिल्या. निवडणूक लढवलेल्या 291 उमेदवारांपैकी 211 जण हरले, ज्यात ममता बॅनर्जी सरकारमधील अनेक प्रमुख नेते आणि मंत्र्यांचा समावेश आहे. सर्वात मोठा धक्का स्वतः ममता बॅनर्जी यांनाही बसला, त्यांनी भवानीपूर हा त्यांचा बालेकिल्ला गमावला. या पराभवाच्या समीक्षेदरम्यान, टीएमसीने पुन्हा एकदा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. जनतेचा कौल “लुटण्यात आला” आणि “चोरला” , असा आरोप एका सभेत ममता बॅनर्जी यांनी आरोप केला होता.
