
फटाक्यांशिवाय दिवाळी हा सण अपूर्णच मानला जातो. फटाके आणि त्यामुळे होणारं वायू, ध्वनी प्रदूषण हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. फटाक्यांवर निर्बंध आणण्याची मागणी सातत्याने केली जातेय. याच फटाक्यांसंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरात ग्रीन फटाके विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने काही कडक अटींवर परवानगी दिली आहे. परंपरेबरोबरच पर्यावरणही जपण्यासाठी न्यायालयाने हे पाऊल उचललं आहे. ग्रीन फटाक्यांमुळे कमी प्रदूषण होतं. त्यामुळे हे ग्रीन फटाके वाजवण्यास दिवाळीपूर्वी काही दिवस आणि प्रत्यक्ष सणांच्या दिवशी काही तास परवानगी असेल. 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान फटाक्यांच्या विक्रीला परवानगी असेल. ही एक चाचणीच असून निर्धारित वेळेसाठीच हा दिलासा असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. एकीकडे पर्यावरणामधील प्रदूषण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्या आणि दुसरीकडे फटाका उत्पादकांचा जगण्याचा आणि व्यवसाय करण्याचा हक्क आहे, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद...