
Bihar politics : बिहारच्या राजकारणात सध्या चांगलाच गोंधळ सुरू आहे. राज्यातला हा गोंधळ देशाच्या राजकारणावर देखील मोठा परिणाम करु शकतो. कारण लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. आरजेडी आणि जेडीयू युती तुटण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून अजून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. आरजेडीकडून त्यांना भूमिका लवकर स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. हा गोंधळ सुरु असतानाच आणखी एक बातमी पुढे आली आहे. ती म्हणजे काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे काही आमदार एक वेगळा गट बनवण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा आहे.
काँग्रेसचे 10 आमदार वेगळे झाले तर आरजेडीचा खेळ बिघडणार आहे. सध्याच्या परिस्थितीत, नितीश कुमार वेगळे झाले तर ते बहुमतापासून 8 आमदार मागे असतील. त्यामुळे मांझी यांचे 4 आमदार, AIMIM चा 1 आमदार, सुमित सिंग (अपक्ष) यांचा समावेश करून ही दरी भरून काढू शकतात. पण आता बातमी अशी आहे की, काँग्रेसच्या एकूण 19 पैकी 10 आमदारांनीही पक्षांतर केले, तर मात्र बहुमताचा आकडा गाठणं त्यांना कठीण होईल.
पशुपती पारस, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांना मानाची जागा दिली जाईल असं भाजपकडून आश्वासन दिले गेले आहे. नितीश कुमार आणि कुशवाह एकत्र आल्यास आगामी निवडणुकीत भाजपला देखील मोठा फायदा होईल. 2025 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप महायुती मजबूत करण्यासाठी तयारी करत आहे.
नितीश कुमार काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. नितीश कुमार यांना इंडिया आघाडीत संयोजक पद न दिल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. जागावाटपात होत नसलेलं एकमत, विलंब आणि समन्वयकपदाचा निर्णय न झाल्याने नितीश कुमार काँग्रेसवर नाराज आहेत.
बिहारमध्ये JDU चे 17 (16+1) खासदार आहेत. त्यामुळे जेडीयूचे पारडे जड आहे. भाजपला देखील जेडीयूच्या मतांना फायदा होऊ शकता. कारण बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. भाजपच्या या जागांवर डोळा आहे. आगामी लोकसभा आणि २०२५ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचा मास्टरप्लान तयार आहे