TVK Vijay : कोश्यारीनंतर ज्यांची इतकी चर्चा, विजय सरकारचं नशीब ज्यांच्या हातात ते राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर कोण?

TVK Vijay : विजयचा TVK तामिळनाडूतील मोठा पक्ष आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना बोलावलं पाहिजे. राज्यपाल आपल्या संवैधानिक जबाबदारीचं पालन करत नाहीयत अशी टीका सुरु झाली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर कोण आहेत?

TVK Vijay : कोश्यारीनंतर ज्यांची इतकी चर्चा, विजय सरकारचं नशीब ज्यांच्या हातात ते राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर कोण?
Vijay-rajendra vishwanath arlekar
Image Credit source: PTI
| Updated on: May 08, 2026 | 1:13 PM

तामिळनाडूत सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजयचा TVK सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण बहुमतासाठी त्यांना 11 जागा कमी पडतायत. विजयने आतापर्यंत दोनवेळा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. विजयला अजूनपर्यंत बहुमत सिद्ध करता आलेलं नाही. द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे तामिळ राजकारणातील दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यांनी विजयला पाठिंबा द्यायला नकार दिला आहे. या सगळ्यात आता राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भूमिका महत्वाची आहे. पण राज्यपालांवर सुद्धा आता काही जणांनी टीका सुरु केली आहे. विजयचा TVK तामिळनाडूतील मोठा पक्ष आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना बोलावलं पाहिजे. राज्यपाल आपल्या संवैधानिक जबाबदारीचं पालन करत नाहीयत अशी टीका सुरु झाली आहे.

तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? या बद्दल जाणून घ्या. मार्च 2026 मध्ये राजेंद्र आर्लेकर केरळच राज्यपाल असताना त्यांच्याकडे तामिळनाडूची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. तामिळनाडूच्या द्रविड राजकारणातील पांरपारिक दिग्गजांची ताकद कमी होत असून नवीन समीकरणं आकाराला येत आहेत. अशावेळी राजेंद्र आर्लेकर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांचा राजकीय इतिहास काय?

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांचा गोव्याशी संबंध आहे. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1954 रोजी गोव्याच्या पणजी शहरात झाला. लहानपणापासूनच ते वैचारिक दृष्टया राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जोडलेले आहेत. 1989 साली भाजपमधून त्यांनी आपली राजकीय इनिंग सुरु केली. गोव्याच्या राजकारणात त्यांनी फक्त कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं नाही, तर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा संभाळली. वर्ष 2012 मध्ये गोवा विधानसभा अध्यक्ष बनले.जवळपास तीन वर्ष ते या पदावर होते. त्यानंतर 2015 साली गोवा सरकारमध्ये पर्यावरण व वन मंत्रालयाची जबाबदारी संभाळली. गोवा विधानसभेला पूर्णपणे पेपरलेस बनवणं ही त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख उपलब्धी आहे.

टर्निंग पॉइंट ठरला

1975 ते 77 या आणीबाणीच्या काळात आर्लेकर आणि त्यांचे वडिल RSS कडून आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं. हाच काळ त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. जेल मधल्या अनुभवामुळे लोकशाही स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे त्याची जाणीव झाली असं आर्लेकर सांगतात.

किती राज्यांचं राज्यपालपद भूषवण्याचा अनुभव?

जुलै 2021 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे 21 वे राज्यपाल होते. फेब्रुवारी 2023 ते जानेवारी 2025 पर्यंत त्यांनी बिहारचे 29 वे राज्यपाल म्हणून काम पाहिलं. 2 जानेवारी 2025 रोजी केरळचे 23 वे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली. 12 मार्च 2026 रोजी तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला.

Follow Us