महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोण जाणार? काँग्रेस जुन्यांनाच पाठवणार की नवीनला संधी देणार? 4 नावं चर्चेत

| Updated on: Sep 11, 2021 | 5:10 PM

निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे नवनवीन नावं चर्चेत येतील. पण काँग्रेस प्रामुख्यानं चार नावांवरच विचार करत असल्याचं वृत्त आहे. हे चार नेते आहेत-मुकूल वासनिक, गुलाम नबी आझाद, राजीव शुक्ला आणि राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोण जाणार? काँग्रेस जुन्यांनाच पाठवणार की नवीनला संधी देणार? 4 नावं चर्चेत
सातव,शुक्ला,वासनिक की आझाद? राज्यसभेवर कोण?
Follow us on

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेली राज्यसभेची जागा भरली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक जाहीर झालीय. ही निवडणूक 4 ऑक्टोबरला होणार आहे. निकालही त्याच दिवशी लागणार. काँग्रेसकडून महाराष्ट्रातल्या एका जागेसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्यात संजय निरुपम आहेत तसच मिलिंद देवराही आहेत. अविनाश पांडे यांचंही नाव चर्चेत आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे नवनवीन नावं चर्चेत येतील. पण काँग्रेस प्रामुख्यानं चार नावांवरच विचार करत असल्याचं वृत्त आहे. हे चार नेते आहेत-मुकूल वासनिक, गुलाम नबी आझाद, राजीव शुक्ला आणि राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव.

मुकूल वासनिक-
मुकूल वासनिक हे सध्या काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे जे काही निर्णय होतात, त्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. गांधी कुटूंबियांशी त्यांची जवळीक आहे. त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रीपदही भूषवलेलं आहे. वासनिक हे रामटेकमधून लोकसभेवर निवडूण गेले होते, नंतर मात्र ते पडले. त्याआधी त्यांनी बुलडाण्यातूनही लोकसभा लढवली होती आणि जिंकली होती. वासनिक हे कदाचित असे एकमेव नेते आहेत, ते एका निवडणुकीत जिंकतात आणि त्याच्या पुढच्या निवडणुकीत ते हरतात. सध्या ते पक्षाचं संघटनात्मक जबाबदारी पार पाडतात. राज्यसभेच्या एका जागेसाठी त्यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर आहे.

गुलाम नबी आझाद
गुलाम नवी आझाद यांची अलिकडेच राज्यसभेतली कारकिर्द संपलीय. त्यांनी जवळपास राजकारणातूनच काढता पाय घेतलेला आहे असं सध्या तरी मानलं जातंय. ज्या दिवशी आझाद राज्यसभेत निवृत्त झाले त्यादिवशी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आठवणी जागवल्या होत्या. त्याक्षणी मोदींना कंठ दाटून आला होता. एखाद्या काँग्रेसच्या नेत्यासाठी पंतप्रधानांना एवढं भावनिक होताना देशानं पहिल्यांदा पाहिलं. ज्याप्रमाणे आझादांना सभागृहात निरोप देण्यात आला, त्यावरुनच आझादांची राजकीय कारकिर्द संपल्याचं मानलं जातं. पण काँग्रेस कधी कुणाला कुठे पद देईल सांगता येत नाही. कधी कधी अडगळीत पडलेल्या नेत्यांना आणून पदं दिलेली आहेत. त्यामुळे गुलाम नबी आझाद यांचंही नाव महाराष्ट्रातल्या एका जागेसाठी आहे. राहुल गांधी दोन दिवसाच्या जम्मू दौऱ्यावर होते. त्यावेळेस पक्षाच्या सर्व बैठकांमध्ये आझाद राहुल गांधींसोबत होते हे विशेष.

राजीव शुक्ला-
राजीव शुक्लांचं नाव बीसीसीआय, क्रिकेट, आयपीएल यासाठीच जास्तीत जास्त घेतलं जातं. अधूनमधून ते काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रम, बैठकांनाही असतात. तेही राज्यसभेतून अलिकडेच रिटायर झालेत. दिल्लीत लॉबिंग करण्यात तसे ते माहिर आहेत. त्यामुळे त्यांचंही नाव राज्यसभेच्या एका जागेसाठी चर्चेत आहे. पण पक्षाची जी अवस्था आहे त्यावरुन शुक्लांना पुन्हा राज्यसभेवर पाठवून काय फायदा होईल ह्या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसला शोधावं लागेल. ते मिळवणं एवढं सोपं नाही.

प्रज्ञा सातव-
प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. तेव्हापासून काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, त्याऐवजी प्रज्ञा यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह देखील पुढे आला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.

Gujrat CM Resigns : पाटील, मांडवीय, पटेल की जदाफिया? कोण होणार गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री, वाचा सविस्तर

Health care : ‘हे’ 5 हेल्दी ड्रिंक्स तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर!

PHOTO: गौराईच्या देखण्या मुखवट्यांनी सजली बाजारपेठ, पाहूनच मन प्रसन्न होईल, माहेरवाशीणीच्या आगमनाची उत्सुकता