
विमानाने प्रवास करणं हे आजकाल खूप सामान्य झालं आहे. ते वेगवान आणि आरामदायक असतं. पण विमान अपघातांच्या बातम्या ऐकल्या की मनात भीती निर्माण होते. अहमदाबादमध्ये नुकत्याच एअर इंडियाच्या विमानाला Take-off च्या वेळी झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे की, विमान उड्डाण करताना किंवा लगेच केल्यानंतर अपघात होण्याची शक्यता जास्त का असते?
आकडेवारीनुसार, जगात जेवढे विमान अपघात होतात, त्यापैकी सुमारे ३५% अपघात हे टेक-ऑफच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच होतात. विमान एकदा विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर अपघाताचा धोका तुलनेने कमी होतो. टेक-ऑफच्या वेळी विमान जमिनीवरून अत्यंत वेगाने धावपट्टीवर धावतं आणि हवेत झेपावतं. या काही क्षणांमध्ये पायलटला विमानाचे इंजिन, इतर सिस्टीम्स, हवामान आणि धावपट्टी या सगळ्या गोष्टींवर खूप जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं, कारण या सगळ्यांवर प्रचंड दबाव असतो. थोडीशी चूक किंवा तांत्रिक बिघाड मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकतो.
इंजिन निकामी होणे: टेक-ऑफच्या वेळी विमानाचे इंजिन त्याच्या सर्वाधिक क्षमतेवर काम करत असते. अशावेळी इंजिनमध्ये कोणताही छोटासा तांत्रिक बिघाड, उदाहरणार्थ पक्षी धडकणे किंवा Manufacturing Defect, तात्काळ मोठ्या अपघाताचं कारण बनू शकतो. एक इंजिन निकामी झाल्यास परिस्थिती सांभाळणं खूप कठीण होऊन बसतं.
पायलटची चूक: Human Error हे विमान अपघातांचं एक मोठं कारण आहे, विशेषतः टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी. टेक-ऑफ करताना पायलटला विमानाचा ‘Pitch Angle’ (विमानाचं नाक किती वर उचलायचं), योग्य वेग आणि धावपट्टीवरून विमान कधी वर उचलायचं याचा अचूक निर्णय घ्यावा लागतो. यात थोडी जरी चूक झाली, तरी गंभीर परिणाम होऊ शकतात.
खराब हवामान: टेक-ऑफच्या वेळी हवामानाची भूमिका खूप महत्त्वाची असते. अचानक आलेलं वादळ, सोसाट्याचा वारा, Low Visibility किंवा ‘Microburst’ (अचानक खाली येणारा वाऱ्याचा जोरदार झोत) यांसारख्या हवामानातील बदलांमुळेही अपघात होऊ शकतात. खराब हवामानात विमानाला नियंत्रित करणं पायलटसाठी खूप आव्हानात्मक असतं.
तांत्रिक बिघाड: विमानाच्या इतर महत्त्वाच्या भागांमध्ये अचानक बिघाड होणं हेही अपघाताचं कारण ठरू शकतं. उदाहरणार्थ, Landing Gear वेळेवर आत न जाणं किंवा त्यात बिघाड होणं, Autothrottle System मध्ये समस्या येणं, Hydraulics निकामी होणं किंवा Airspeed Indicator चुकीची माहिती देणं. टेक-ऑफच्या वेळी प्रतिक्रिया द्यायला खूप कमी वेळ मिळतो, त्यामुळे कोणताही तांत्रिक बिघाड धोकादायक ठरू शकतो.
धावपट्टीवरील समस्या: कधीकधी धावपट्टीवर अनपेक्षित अडथळे, धावपट्टी निसरडी असणे किंवा तिची लांबी कमी असणे यांसारख्या गोष्टीही टेक-ऑफच्या वेळी धोका निर्माण करू शकतात.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)