आधी पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलं व्रत आणि मग नवऱ्यालाच संपवलं, काकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या भाचीचं भयंकर कांड
बिहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नात्याला काळिमा फासला गेला आहे. प्रियकरासाठी नवविवाहितेनं आपल्या पतीची हत्या केली आहे.

बिहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नात्याला काळिमा फासला गेला आहे. नवविवाहितेनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या केली आहे. विशेष म्हणजे हा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून, आरोपी महिलेच्या आत्त्याचा पती म्हणजेच तिचा काकाच होता. या महिलेनं आपल्या प्रियकर काकासोबत कट रचून आपल्या पतीची हत्या केली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
24 जून रोजी औरंगाबाद जिल्ह्यातल्या लेंबोखाप येथील रहिवासी असलेल्या प्रियांशु कुमार सिंह यांची दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. ज्यामुळे पुन्हा एकदा बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणात एसआयटीची स्थापना करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तपासादरम्यान मृत प्रियांशु याच्याशी संबंधित असलेल्या लोकांची चौकशी सुरू केली. पोलिसांनी प्रियांशुची कॉल डिटेल्स काढली. सीसीटीव्ही फुटेज देखील तपासलं. त्याच दरम्यान प्रियांशुची पत्नी गुंजा देवीची देखील चौकशी करण्यात आली, चौकशीदरम्यान पोलिसांना त्याच्या पत्नीचा संशय आला.
त्यानंतर पोलिसांनी प्रियांशुची पत्नी गुंजा देवीची देखील कॉल डिटेल्स काढली. त्यामध्ये असं आढळून आलं की, गुंजा देवी ही सातत्यानं आपला काका आत्त्याचा पती जीवन कुमार याच्या संपर्कात होती. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. गुंजा देवी हिनेच आपल्या काकाच्या मदतीनं पतीच्या हत्येचा कट रचला होता. त्यानंतर प्रियांशु कुमारची ज्या दोन आरोपींनी हत्या केली होती, त्यांना देखील पोलिसांनी झारखंडमधून अटक केली आहे. आपल्याला गुंज देवीनेच या हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती या दोघा शार्प शूटर्सनी दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार गुंजा देवी हीचं तिच्याच काकासोबत गेल्या 15 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं, त्यामुळे ती या लग्नामुळे खूष नव्हती. तिने यापूर्वी देखील अनेक मुलांना नकार दिला होता. मात्र आता लग्न झाल्यामुळे तिने आपल्याच पतीची हत्या केली. विशेष म्हणजे तिने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत देखील केलं होतं, आणि त्यानंतर गुंज देवीने आपल्या पतीची हत्या घडवून आणली.
