
टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमामध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी टोल संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. लोक म्हणतात नितीन गडकरी रस्ते तर चांगले बनवतात मात्र टोल प्रचंड प्रमाणात वसूल करतात असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, जर तुम्हाला चांगली सेवा पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे तर मोजावेच लागणार आहेत. पण मी तुम्हाला विश्वास देतो की, पुढील आठवड्यात मी टोल संदर्भांत मोठी घोषणा करणार आहे, यामुळे लोकांची टोल संदर्भात जी काही नाराजी आहे, ती सर्व दूर होईल.
पुढच्या दोन वर्षांमध्ये 25 हजार किमी लांबीचे रस्ते
नितीन गडकरी यांचे टोल संदर्भातील अनेक मीम सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत, यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, टोलचा जनकच मी आहे. महाराष्ट्रात मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा मी मुंबई-पुणे हाय वे वर 55 फ्लायओवर्स बनवले होते. वांद्रा -वरळी सीलिंक प्रोजेक्ट बनवला. यासाठी मी मार्केटमधून पैसे उभारला. दोन दिवसांपूर्वीच मी संसदेमध्ये सांगितलं आहे की मी येत्या दोन वर्षांमध्ये तब्बल 25 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बनवणार आहे. ज्याचं बेजट दहा लाख कोटी रुपये इतकं असेल.
पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही मार्केटमधून पैसे उभारला त्यासाठी आम्ही कॅपिटल मार्केटच्या इनविट मॉडलचा वापर केला. आमच्याकडे सात दिवसांचा वेळ होता. पण एक दिवस आणि सात तासांमध्येच कॅपिटल जमा झालं. सध्या शंभर रुपयांचा शेअर 140 रुपयांवर पोहोचला आहे. मी जर कर्ज घेतलं तर ते वापस पण करावंच लागणार आहेना, आज भारतामध्ये वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे, ट्राफिक जाम होत आहे. तुम्ही म्हणाल रस्ते चांगले तयार करा, उड्डाणपूल तयार करा तर त्यासाठी भांडवल तर लागणारच आहे ना? त्यासाठी पैसे कुठून आणणार? असा सवाल यावेळी नितीन गडकरी यांनी केला आहे. येत्या काळात आपले रस्ते हे अमेरिकेपेक्षाही चांगले असतील असंही यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.