आईस्क्रीम खाताना महिलेच्या दाताखाली कडक काहीतरी अडकलं, दृश्य पाहताच सुरु झाल्या उलट्या
तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेमुळे अहमदाबादमधील खाद्य सुरक्षा मानकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे.

आईस्क्रीम म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यात आता उन्हाळा सुरु असल्याने आईस्क्रीम खाणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकांना आईस्क्रीम खाण्याचा मोह आवरत नाही. पण आता आईस्क्रीम खाणं हे एका महिलेच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँडच्या कोनमध्ये पालीची शेपटी आढळली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अहमदाबादमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नेमकं काय घडलं?
उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोकांना आईस्क्रीम खाण्याचा शौक असतो. पण गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँडच्या कोनमध्ये पालीची शेपटी आढळल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. अहमदाबादच्या मणिनगर परिसरात ही घटना घडली. महिलेने केलेल्या आरोपानुसार, मी आईस्क्रीम खाण्यासाठी महालक्ष्मी कॉर्नरमध्ये गेले होते. तिथे मी एक आईस्क्रीम कोन खरेदी केला. आईस्क्रीमचा कोन खाताना मला तोंडात काहीतरी वेगळं आलं. मी ते पाहिलं असता, ती पालीची शेपटी होती.
दुकानदाराने पक्के बिल दिले नव्हते
यानंतर तिला असह्य उलट्या सुरू झाल्या. तिच्या कुटुंबियानी तिला त्वरित रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी महिलेवर तातडीने उपचार सुरू केले. पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मणिनगर क्रॉसिंगजवळील महालक्ष्मी कॉर्नरमधून हे आईस्क्रीम कोन खरेदी केले होते. त्यावेळी आम्हाला दुकानदाराने पक्के बिल दिले नव्हते. एका मोठ्या आणि प्रसिद्ध ब्रँडच्या उत्पादनात अशा वस्तू आढळत असतील तर इतर लहान ब्रँड्कडून काय अपेक्षा ठेवावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अहमदाबादमधील खाद्य सुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्न
विशेष म्हणजे, अहमदाबादमध्ये यापूर्वीही खाद्यपदार्थांमध्ये अळ्या आणि कीटक आढळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जोधपूरमधील लॅपीनो पिझ्झा आऊटलेटमध्ये एका महिलेला पिझ्झा बॉक्समध्ये मृत झुरळ सापडले होते. त्यावेळी मॅनेजमेंटने योग्य प्रतिसाद न दिल्याचे महिलेने म्हटले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे अहमदाबादमधील खाद्य सुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्न उभे केले जात आहेत.
