अफगाणिस्तान: जिथं सिकंदर थकला, औरंगजेबाचा दारुण पराभव झाला, रशिया-अमेरीकेनं पळ काढला

| Updated on: Aug 19, 2021 | 10:40 PM

याचाच अर्थ असा की अजून फिल्म पूर्ण संपलेली नाही. फार फार तर क्लायमॅक्स झालाय असं समजा. पण एक गोष्ट निश्चित. एकदम ओसाड, बोडक्या वाटणाऱ्या ह्या भूमीवर एकही सम्राट, महासत्ता स्वत:चा पाय रोवू शकली नाही. तालिबानचा अर्थ आहे विद्यार्थी. तो एक पश्तो शब्द आहे. सम्राट, महासत्तांचे पराभव पाहिले की, का ह्या अफगाण भूमीला 'साम्राज्यांचं कब्रस्तान' म्हटलं जातं याचा अंदाज येईल.

अफगाणिस्तान: जिथं सिकंदर थकला, औरंगजेबाचा दारुण पराभव झाला, रशिया-अमेरीकेनं पळ काढला
अफगाणिस्तान-जी जगाची कायम युद्धभूमी राहीला.
Follow us on

अफगाणिस्तान असा एक देश आहे जिथं बहुतांश साम्राज्य पराभूत झाले. मोठमोठ्या यौद्ध्यांना ह्या भूमीनं थकवल्याचा इतिहास आहे. त्यात जगजेत्ता सिकंदर आहे, मोगल बादशाह औरंगजेबही आहे आणि अलिकडच्या काळातले रशिया-अमेरीकाही. म्हणूनच याला ‘साम्राज्यांचं कब्रस्तानही’ म्हटलं जातं. असं काय आहे ह्या भूमीत की इथं मोठ्या योद्ध्यांना हात टेकावे लागले? इथली टोळीबाज
संस्कृती येणाऱ्या प्रत्येकाला घामटा कशी काय फोडते?

सिकंदरची गोष्ट
विश्वविजेता सिकंदर ग्रीसचा. त्यानं ठरवलं की, संपूर्ण जग पायाखाली घ्यायचं. त्यासाठी तो मोहीमेवर निघाला. त्याच्या मार्गात येणारी एक एक राज्य, साम्राज्य तो जिंकत निघाला. मेसोपोटेमिया, पार्शियाही त्यातून सुटले नाहीत. शेवटी तो अफगाणिस्तानमध्ये आला. त्याला वाटलं हा तर एक छोटासा प्रदेश आहे, त्यातही राजा म्हणून असं कुणी नाहीच. सहज जिंकू. पण नेमकी तिच गोष्ट त्याच्या विरोधात गेली. अफगाणिस्तानमध्ये त्यावेळेस छोट्या छोट्या टोळ्या होत्या, त्यांचे सरदार होते, कबिले होते आणि ते सगळे एकमेकांशी तुंबळ युद्ध करायचे. लढण्याची पद्धत गनिमी होती, रानटी होती. हल्ले लपून छपून केले जायचे. त्यातच समोरचा नामोहरम व्हायचा. सिकंदरलाही याचा सामना करावा लागला.

सिकंदरनेही अफगाणिस्तान जिंकलं पण ते एका फटक्यात नाही. त्यासाठी त्याला तीन वर्षे लढा द्यावा लागला. तो अफगाणिस्तानमध्ये अडकून पडला त्यावेळेस त्याच्या आईनं खलिता पाठवून विचारलं होतं, पुढे जाणार की इथंच अडकून पडणार? त्यावर सिकंदरनं स्वत:च्या आईला अफगाणिस्तानची माती पाठवून दिली होती म्हणतात आणि ती माती तिला त्याच्या भूमीत शिंपडायला सांगितली होती. सिकंदरच्या
आईनं सांगितलं तसं केलं. थोड्याच काळात तिथं आपआपसात भांडणं सुरु झाली. अफगाणिस्तानच्या मातीचा गुण काय आहे हे सिकंदरनं स्वत:च्या आईला सांगण्याचा हा प्रयत्न केला. तेच उदाहरण कदाचित आजही अफगाण भूमिला जशास तसं लागू पडतं. इथल्या मातीतच रानटीपण आहे. वैर आहे.

औरंगजेबाचा दारुण पराभव
कंदहार हे अफगाणिस्तानातलं एक प्रमुख शहर आहे. एकेकाळी त्याला काबूलपेक्षा जास्त महत्व होतं. कारण व्यापारामुळे त्याची भरभराट झालेली होती. भारतातूनच नाही तर इतर मसाल्याचं उत्पादन करणाऱ्या बेटांचाही पर्शिया आणि तिथून पुढे युरोपात जो व्यापार चालायचा तोही ह्या कंदहारमधून. विशेष म्हणजे कंदहारची स्थापनाच मुळात अलेक्झांडर द ग्रेट म्हणजे सिकंदरनेच केलीय. कंदहारचं जेवढं व्यापारीक महत्व होतं तेवढंच लष्करी आणि राजकीयही होतं. त्यामुळेच त्यावर ताबा मिळवण्यासाठी मोगल बादशाह आणि पर्शियन राजे यांच्यात नेहमी लढाया व्हायच्या. 1649 ते 1652 दरम्यान मोगलांनी कंदहारला वेढा देण्याचा प्रयत्न केला. शहाजहानचा तो काळ होता. नेतृत्व
होतं औरंगजेबाचं. औरंगजेबाच्या पहिल्या स्वारीत 50 हजार सैन्य होतं. त्यानं 14 मे 1649 रोजी कंदहारच्या किल्ल्याला वेढा दिला. 3 महिने 20 दिवस झाल्यानंतरही औरंगजेबाला कंदहार जिंकता आलं नाही. त्याला माघार घ्यावी लागली. नंतर पुन्हा औरंगजेब आणि सादुल्लाखान यांनी 2 मे 1652 रोजी कंदहारला वेढा घातला. यावेळेस औरंगजेबाची तयारी पहिल्यापेक्षा जास्त होती. तोफगोळे वगैरे सगळी रसद पुरेपूर होती. पण दोन महिन्यानंतरही, सातत्यानं कंदहारच्या किल्ल्यावर मारा करुनही औरंगजेबाला यश मिळालं नाही. शेवटी शहाजहाननं त्यांना परत बोलवून घेतलं.

दारा शुकोहचा पराभव
कंदहारचं अपयश शहाजहानच्या जिव्हारी लागलं. मोगलांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. मोगलराजे लढाई न करता फक्त लाच देऊनच किल्ले जिंकू शकतात असं त्यावेळेस पर्शियन राजे म्हणायचे. ते खोटं ठरवण्यासाठी शहाजहाननं पुढच्याच वर्षी दारा शुकोहच्या नेतृत्वात कंदहारवर चढाई केली. या लढाईत दारा शुकोहनं अफाट पैसा ओतला. संपूर्ण स्वारीचा खर्च हा दहा कोटी रुपये होता अशा ऐतिहासिक नोंदी आहेत. असं असतानाही दारा शुकोहवलाही पराभवच स्वीकारावा लागला. मोगलांची प्रचंड मोठी नाचक्की झाली. औरंगजेबापेक्षा दाराचा पराभव दारुण होता.

सोव्हिएत यूनियनची शकलं
आता थोडसं आधूनिक घटनांकडे येऊयात. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जग दोन महासत्तांमध्ये विभागलं गेलं. कम्युनिस्ट आणि भांडवलदार. सोव्हिएत यूनियन कम्युनिस्टांचं नेतृत्व करायचा आणि अमेरीका भांडवलदार देशाचं. अफगाणिस्तानमध्ये कम्युनिस्ट राजवट आणावी म्हणून सोव्हिएयत यूनियननं अफगाणिस्तानमध्ये थेट रणगाडे घातले. हे एक प्रकारचं दुसऱ्या देशावरचं आक्रमणच होतं. सोव्हिएत यूनियननं अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केलीय म्हटल्यानंतर अमेरीका बघ्याची भूमिका कशी घेणार? ते तर स्वत:ला जगाचे पोलीस मानतात. सोव्हिएत यूनियनच्या विरोधात काही टोळ्यांनी उठाव केला. शस्त्र हातात घेणं त्यांना नवीन नव्हतच. गनिमी काव्यानं त्यांनी सोव्हिएत यूनियनला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. ह्या टोळ्यांना अमेरीका, पाकिस्तान, इराण, ब्रिटन ह्यांनी पैसा पुरवला, शस्त्र पुरवली. जवळपास 9 वर्षे हे शीत युद्ध सुरु राहीलं. हे सगळं 1980 च्या दशकात सुरु झालं. 90 च्या आसपास टोक गाठलं. ह्या सगळ्या काळात अफगाणिस्तानचे
जवळपास 11 टक्के लोकसंख्या नाहीशी झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे किती जीवित हाणी झाली असेल याचा अंदाज येईल. शेवटी सोव्हिएत यूनियनलाच माघार घ्यावी लागली. हा पराभव एवढा मोठा होता की, त्यामुळे सोव्हिएत यूनियनची शकलं पडली.

तालिबानचा ‘बाप’ अमेरीका
तालिबानचा जन्म किंवा उदय हा कंदहारमध्येच झाला. ज्या टोळ्या, गट रशियाच्या विरोधात लढले त्या तशाच राहील्या. त्यांच्याकडे अमेरीकेनं पुरवलेला पैसा होता. शस्त्र होती. त्यातूनच तालिबानचा जन्म झाला. त्यांनी नवी घोषणा दिली आणि ती होती शरीयावर आधारीत अफगाणिस्तान बनवण्याची. मोहम्मद नजीबुल्लाह हे राष्ट्रपती होते. त्यांना सोव्हिएत यूनियनचा आधी पाठिंबा होता. पण त्यांची शकलं पडली. तो पाठिंबा थांबला. इकडे तालिबान आता सक्रिय झालेले होते. त्यांना काबूल दिसत होतं. तिथली सत्ता दिसत होती.

मुल्ला ओमरच्या नेतृत्वात इस्लामिक अमीरात बनवण्याचं लक्ष्य होतं. 1992 साली राष्ट्रपती नजीबुल्लाहनं राजीनामा दिला. इतर ठिकाणी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आलं नाही. संघर्ष सुरुच होता. तालिबान्यांनी एक एक शहर पादाक्रांत केलेलं होतं. नजीबुल्लाहनं शेवटी यूएनच्या हेडक्वार्टरमध्ये आश्रय घेतला. सोबत त्यांचा भाऊही होता. पण 1996 च्या सप्टेबर महिन्यात तालिबान्यांनी काबूल काबीज केलं. 27 सप्टेंबर रोजी ते यूएन हेडक्वार्टरमध्ये घुसले आणि नजीबुल्लाहसह त्यांच्या भावाला ठार मारलं. दोघांची प्रेतं चौकात लटकवण्यात आली. एवढच नाही तर त्यांची गुप्तांगही कापली. एवढ्या क्रुरपणे तालिबाननं राष्ट्रपतीचा शेवट केला. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली.

अमेरीकेची हातघाई
हा सप्टेबर महिनाच होता जेव्हा जगाचा इतिहास पूर्णपणे बदलला. 11 सप्टेबर 2001 रोजी अतिरेक्यांनी अमेरीकेच्या छाताडावर वार केला. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन ट्विन टॉवरवर दोन विमानं आदळवण्यात आली. बघता बघता दोन्ही टॉवर्स जमिनदोस्त झाली. हा सगळा प्रसंग जगानं टीव्हीवर पाहिला. अमेरीकेनं अल कायदाला जबाबदार धरलं. त्यांना आश्रय देणारे तालिबान अमेरीकेच्या टार्गेटवर आले. त्यांचा
बंदोबस्त करण्यासाठी अमेरीकेनं अफगाणिस्तानमध्ये थेट सैन्य घुसवलं. तालिबानच्या विरोधात अनेक मोहिमा हाती घेतल्या. अनेक देशाचं बाहुलं असलेल्या अफगाण सरकारवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. दरम्यानच्या काळात काही वर्षापूर्वी ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आला. अमेरीकेचा बदला पूर्ण झाल्याच्या घोषणा आधी ओबामांनी केली नंतर ट्रम्पनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आता जो बायडेन यांनी तर हातच वर केले.

ह्या सगळ्या काळात म्हणजे 20 वर्षात तालिबानचा बिमोड मात्र होऊ शकला नाही. एक ओसामा बिन लादेन मारला पण तालिबानी वाढतच राहीले. काही दिवसांपूर्वी अमेरीकन सैन्यानं अफगाणिस्तानमधून गाशा गुंडाळायला सुरुवात केली. तालिबाननं पुन्हा डोकं वर काढलं आणि काही आठवड्यात कंदहार, काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला. तालिबान म्हणजे अमेरीकेनं जन्माला घातलेला राक्षस आहे ज्याचा शेवटी बिमोड करणेही त्यांना जमलं नाही. आजच्या घडीला अमेरीकेची तशीच नाचक्की होतेय जशी आधी सोव्हिएत यूनियनची झाली. त्यामुळेच कधी काळी अमेरीकेच्या पाठिंब्यावर असलेल्या तालिबान्यांना आता चीन, रशिया पाठिंबा देताना दिसतायत.

याचाच अर्थ असा की अजून फिल्म पूर्ण संपलेली नाही. फार फार तर क्लायमॅक्स झालाय असं समजा. पण एक गोष्ट निश्चित. एकदम ओसाड, बोडक्या वाटणाऱ्या ह्या भूमीवर एकही सम्राट, महासत्ता स्वत:चा पाय रोवू शकली नाही. तालिबानचा अर्थ आहे विद्यार्थी. तो एक पश्तो शब्द आहे. सम्राट, महासत्तांचे पराभव पाहिले की, का ह्या अफगाण भूमीला ‘साम्राज्यांचं कब्रस्तान’ म्हटलं जातं याचा अंदाज येईल.

(संदर्भ-औरंगजेब-जदूनाथ सरकार)

(Afghanistan: Where Alexander was tired, Aurangzeb was defeated, Russia-US fled know all in Marathi )
तालिबान्यांच्या मागे दिसणाऱ्या पेंटींगचं मराठ्यांच्या इतिहासाशी थेट कनेक्शन? वाचा सविस्तर
अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला दिग्दर्शिका, ज्यांनी तालिबान्यांनाही शह दिला! वाचा सबा सहर यांच्याबद्दल