प्रिय बीडीडी चाळ…

प्रिय बीडीडी चाळ...

प्रिय बी.डी.डी. चाळ… स.न.वि.वि. पत्राच्या सुरूवातीलाचं सॉरी म्हणते हा… आता तू म्हणशील ही का मला सॉरी म्हणतेय. त्याचं कारण असं की तुझा 27 नोव्हेंबरला वाढदिवस झाला ना.. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला लक्षातच नाही राहिलं गं… असो आता देते. बिलेटेड HAPPY BIRTHDAY बरं का! अगं तुला तर माहितेय ना आमचं काम… कामाच्या गडबडीत घरच्या तणावात आणि […]

सचिन पाटील

| Edited By:

Aug 29, 2019 | 12:12 PM

प्रिय बी.डी.डी. चाळ… स.न.वि.वि.

पत्राच्या सुरूवातीलाचं सॉरी म्हणते हा… आता तू म्हणशील ही का मला सॉरी म्हणतेय. त्याचं कारण असं की तुझा 27 नोव्हेंबरला वाढदिवस झाला ना.. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला लक्षातच नाही राहिलं गं… असो आता देते. बिलेटेड HAPPY BIRTHDAY बरं का! अगं तुला तर माहितेय ना आमचं काम… कामाच्या गडबडीत घरच्या तणावात आणि तुझ्याबद्दल येणाऱ्या रोज नवनवीन बातम्यांमुळे तुला शुभेच्छा द्यायच्या राहिल्या.. म्हणून पुन्हा एकदा सॉरी… या टॉवरच्या गर्दीत स्वत:ची शान उत्तम राखलीयेस तू.. आणि ह्या फ्लॅटमधल्या लोकांना काय माहित गं तुझी किंमत आणि तुझ्याबरोबरची गंमत..

तर आज तुला हे पत्र लिहिण्याचा घाट घातला कारण की, तुझा वाढदिवस आहेच पण तुला काही विचारायचं आणि काही सांगायचंय.. आता तू म्हणशील कशाला! पण, अगं 94 वर्षे ऊन, पाऊस, थंडी, राजकीय-अराजकीय पावसाळे सर्व पाहिले आहेस तू कसं काय सहन केलसं गं… इतकचं नाही कैदी ते आजपर्यंत नांदणारी कुटुंब तु अंगा-खांद्यावर खेळवले आहेस. या पुढेही खेळवत राहशील हे मला माहित आहे. तुझी ही अविरत सेवा करण्याची प्रथा मी (किंबहुना तुझ्या छायेत वाढलेली प्रत्येक बीडीडीकर) शिकलो आहेत. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी या दगडाच्या चाळी बांधण्याचे आदेश दिले असं इतिहास सांगतो. खरंय का गं हे! बापरे! या दगडाच्या चाळी बांधणं किती कठिण झालं तेव्हाच्या इंजिनिअरला पण मी बाबा त्या लॉर्डचे आभारच मानते तो नसता तर आज तू नसतीस…

फोटो सौजन्य : प्रितेश टिकम

माझी शेजारची आजी ना स्वातंत्र्यापूर्वीपासून आता आम्ही राहतो तिथे राहते. (म्हणजे ती आता हयात नाही तिचं कुटुंब आहे.) ती ना तुझी आठवण सांगते. इंग्रजी राजवट संपल्यावर या जेलचं रुपांतर मुंबईच्या सर्वात मोठ्या चाळीत झालं. ती म्हणायची तुझं रुप तेव्हा फारचं गलिच्छ होतं. कुणीचं नव्हतं गं तुझ्या कुशीत यायला. जेल म्हणून हिणवायचे तुला तेव्हाचे लोक. मगं हळूहळू लोकं न घाबरता तुझ्या 160 चौ. फुटांच्या खोलीत स्थिरावू लागले. आणि तुझा कायापालट झाला.

वर्षांमागून वर्ष गेली राज्याचा सुवर्णकाळ तु अनुभवला.. मुंबईत मिलचं राज्य आलं आणि तू त्या मिल कामगारांची माय माऊली झाली. तू तशी कधी झोपली नाहीसच. पण तू आम्हाला सदैव आताच्या भाषेत प्रोटेक्ट करायचीस. आताही करतेस हा! नाहीतर म्हणशील ही पुराने जमान्याची बाते करते ही मुलगी… तू आम्हाला पोटच्या पोरांप्रमाणे वाढवलं आहेस. आजही जन्म घेतलेल्या बाळाला तू अशीच सांभाळत आहेस…

फोटो सौजन्य : प्रितेश टिकम

1992 जातीय दंगलींनी संपूर्ण भारताला पोखरून काढलं. बाबरी मशीद पाडली आणि तुझ्या पोटात असलेले मुस्लिम बांधव घाबरून गेले. पण हो, तुझ्या छायेत असलेले हिंदू तुझ्याकडून सर्वधर्म भावाची शिकवण शिकले होते ना… त्यांनी आमच्या मुस्लिम बांधवाना कशाचीही झळ पोहोचू दिली नाही. तुझ्या पुण्याईने आजही आम्ही एकत्र नांदतोय. कुणा एकाकडे लग्न असेल ना तर ते सर्वांच्या घरातलं लग्न होऊन जातं. मगं तो कुठलाही जातीचा असो. अगदी माझ्या घरी कुणी नसेल ना तर मला प्रत्येक जण मायेने जेवण आणून देतात. आजकाल टॉवरच्या गर्दीत कुठे भेटतात असे शेजारी?

पण, तुला माहितीये का, तुला आता राजकारण्यांची नजर लागलीये. 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांनी बांधलेल्या तुझ्या लेकरांवर राजकारण्यांची वक्रदृष्टी पडलीये गं. बीडीडी चाळकऱ्यांना किती फुटांचं घर द्यावं कोणी किती लोणी त्यातून खावं याची स्पर्धाच आज लागली आहे. खूप वाईट वाटतं गं तुलाही वाटतं असेल ना. मला ना भिती वाटते तुला कोणी तोडलं ना तर मला (नव्हे बीडीडीत राहणाऱ्या सर्वांना) रडूच येईल. तुला तोडलं तर माझ्यासारखा मध्यमवर्ग या साऊथ मुंबईतून कायमचा निघून जाईल. तू माझी दुसरी आई आहेस. तुझ्या कुशीत मी माझी सगळी सुखं-दु:खं शेअर करते आणि करत राहिन. राहशील ना कायमची माझ्याबरोबर अशीच!

तुझीच मुलगी, अंकिता शिंदे, टीव्ही 9 मराठी, मुंबई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें